सावेडी उपनगरात चोरांचा सुळसुळाट; पोलिसांचे दुर्लक्ष वाढले | पुढारी

सावेडी उपनगरात चोरांचा सुळसुळाट; पोलिसांचे दुर्लक्ष वाढले

नगर; पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहेत. त्यात आता चोरांनी घरासमोर उभा असलेल्या चारचाकी वाहनांकडे मोर्चा वळविला. रविवारी कॉटेज कॉर्नर परिसरात महागडी मोटारकार चोरून नेण्याचा चोरांचा प्रयत्न फसला. सावेडी उपगनरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. गुलमोहर पोलिस चौकीला औरंगाबाद रस्ता ते मनमाड रस्ता अशी हद्द असल्याने रात्रीची गस्त तोडकी पडत आहे.

या परिसरात नव्याने नागरिक वसाहत वाढत आहे. तर, अनेक ठिकाणी चोरांना लपण्यासाठी जागा आहे. तीच परिस्थिती सावेडी व बालिकाश्रम रोड पोलिस चौकीच्या हद्दीत आहे. त्यामुळे सर्वत्र पोलिसांची गस्त कमी पडत आहे. कॉटेज कॉर्नर, डॉन बॉस्को, नंदनवन नगर, आठरे पाटील शाळा परिसर, बारस्कर नगर, पवन नगर तपोवन रोड, सावेडीगाव, पद्मावती पेट्रोलपंप परिसर, पाईपलाईन रोड या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले आहेत. त्यात काही भागात छोटे छोटे घरे असल्याने नागरिक चारचाकी वाहने रस्त्यावर पार्क करीत आहेत. आता चोरांनी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांकडे मोर्चा वळविला आहे. दोन दिवसांपूर्वी कॉटेज कॉर्नर परिसरातील सागर विहार कॉलनीमध्ये महागडी मोटारकार चोरीचा डाव फसला. नागरिक जागे झाल्याने चोरांनी धूम ठोकली.

पोलिसांची गस्त वाढवावी
तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सततच्या चोर्‍या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. आता याप्रकरणी पोलिस अधिक्षक काय भूमिका घेणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागल्याचे पहायला मिळते.

Back to top button