नगर : झेडपी शाळेत ‘फ्युचरीस्टिक क्लासरूम’ | पुढारी

नगर : झेडपी शाळेत ‘फ्युचरीस्टिक क्लासरूम’

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील पानोली शाळेत ई-डेस्क, ई-पोडियम, इंटरअ‍ॅक्टिव्ह स्क्रीन, अशी अत्याधुनिक फ्युचरीस्टिक क्लासरुम उभी केलेली आहे. या क्लासरुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असे शिक्षण मिळत आहे. येणार्‍या काळात जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून स्थापिक केलेल्या फ्युचरीस्टिक क्लासरुमचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी एका 9 सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नगरचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील पानोली येथे चाळीस लाख रुपये खर्चून फ्युचरीस्टिक क्लासरुम उभारलेली आहे.

येथे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ई डेस्क, वह्या पुस्तकांऐवजी इंटरअ‍ॅक्टिव्ह स्क्रीन आहे. प्रत्येक डेस्क हा एफसीएमएस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षकाच्या पोडीयमशी जोडला गेलेला आहे. वातानुकुलित क्लासरुम आहे. अतिशय रंजक पद्धतीने अभ्यासाचे धडे गिरविले जात आहेत. मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव आहे. कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातही असा प्रयोग झालेला आहे.

विद्यार्थ्यांना अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून अभ्यासक्रमातील मूलभूत आणि अमृत संकल्पना दृढ होण्यास मदत होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी फ्युचरीस्टिक क्लासरुमबाबत शासन सकारात्मक असून, त्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती या तंत्रज्ञानातून अध्ययन व अध्यापनाची पद्धती, त्याचे फायदे इत्यादी विषय सूचना, सुधारणांचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.

अशी असेल समिती
समितीचे अध्यक्ष म्हणून शिक्षण सहसंचालक देवीदास कुलाळ हे आहेत, तर सदस्य म्हणून शिक्षणाधिकारी भास्कर पाटील (नगर), ज्येष्ठ अधिव्याख्याते प्रभाकर क्षीरसागर (पुणे), आयटी सेलचे अनिश खोब्रागडे (पुणे), पदवीधर शिक्षक सतिश सातपुते (लातूर), विषय सहायक बाळासाहेब वाघ (वेळापूर), शिक्षक आनंद आनेमवाड (पालघर), मुख्याध्यापक सुनील चौगुले (कोल्हापूर) गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर (कोल्हापूर).

Back to top button