नगर : मुळा धरणातून आजपासून उन्हाळी आवर्तन | पुढारी

नगर : मुळा धरणातून आजपासून उन्हाळी आवर्तन

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने शेतीपाण्याचा प्रश्न पुढे आला होता. त्यामुळे मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन मिळावे, अशी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची मागणी होती. दरम्यान, शेतकर्‍यांच्या मागणीचा विचार करून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आज दि.1 मार्चपासून मुळाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले जाणार आहे. हे आवर्तन 15 एप्रिल 2023 पर्यत सुरू राहील.

सध्या मुळा धरण लाभक्षेत्रात शेतकर्‍यांनी ऊस, कांदा, गहू, मका तसेच चारा पीकांची लागवड केली आहे. मात्र जानेवारी अखेरपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पाण्याची पातळी घटत आहे. फेब्रुवारीमध्ये या झळा तीव्र बनल्या आहेत. त्यामुळे मुळाचे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी खा.डॉ सुजय विखे पाटील यांची भेट घेवून केली होती. शेतकर्‍यांची गरज लक्षात घेवून तत्काळ आवर्तनाचे नियोजन करावे, अशा सूचना खा.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार उन्हाळी आवर्तनाचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. दि.1 मार्च ते 15 एप्रिल 2023 या कालावधीत हे आवर्तन सोडले जाणार आहे. या माध्यमातून लाभक्षेत्रातील अंदाजे 30 हजार हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होणार आहे. 45 दिवस हे आवर्तन सुरू राहाणार असल्याने राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

Back to top button