राहाता : घोलप यांच्याविरुद्ध शिवसैनिकांच्या घोषणा | पुढारी

राहाता : घोलप यांच्याविरुद्ध शिवसैनिकांच्या घोषणा

राहाता; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांचा निषेध करीत सहा तालुक्यांमधील ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिकांनी संतप्त होत राहाता शहरात घोषणाबाजी केली. शिर्डी लोकसभा मतदार संघातील आजी-माजी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख यांची राहाता शहरात शिवाजी महाराज चौकात बैठक झाली. यावेळी नुकतीच नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड झाली. निवड करताना आजी-माजी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले नाही. निवड अयोग्य पद्धतीने झाल्याची भावना निष्ठावंत शिवसैनिकांनी व्यक्त केली.

चार महिन्यांपूर्वी घोलप यांनी हीच कार्यकारिणी जाहीर केली होती. शिर्डी लोकसभा मतदार संघात निष्ठावंत शिवसैनिकांच्या प्रचंड उद्रेकानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकारिणीस स्थगिती दिली होती, परंतु बबनराव घोलप यांनी पक्ष श्रेष्ठींची दिशाभूल करून पक्षप्रमुखांना वेठीस धरून आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांची कुठल्याही प्रकारे मते जाणून न घेता , कुठलीही शहनिशा न करता मनमानी पद्धतीने स्वतःच्या मर्जीतले स्वहिताच्या पदाधिकार्‍यांची निवड केलेली दिसते.

यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये संपर्क नेतेच गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याची शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया मतदार संघात उमटत आहे. यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघातील विजयी होणारी जागा धोक्यात येऊ शकते, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. संपर्कप्रमुख बबनराव घोलप नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये फिरकलेसुद्धा नाही. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी प्रचार केला नाही, अशी ओरड शिवसैनिकांनी केली.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. दिलीप साळगट, माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल, माजी शहरप्रमुख गणेश सोमवंशी, माजी शहरप्रमुख फुलसौंदर दडीयाल, माजी शहरप्रमुख सचिन बडदे, अमोल खापटे, गोरख वाकचौरे, शेखर जमधडे, रामहरी निकाळे, प्रमोद मंडलिक, नवनाथ शेटे, संजय साबळे, राम सहाणे, नामदेव आवारे, भाऊसाहेब गोर्डे, हरिभाऊ शेळके, मच्छिंद्र म्हस्के, बाळासाहेब देशमुख, सुदेश मुर्तडक, बाळासाहेब लहामगे, बाळासाहेब जाधव, पप्पू कानकाटे, अमोल कवडे, दिगंबर सहाणे, समीर ओझा, प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा, वासिम शेख, बाळासाहेब साळुंके, अशोक पवार आदी ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार..!
यावेळी सहा तालुक्यांमधील ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांची भाषणे झाली. संपर्कप्रमुख घोलप यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना भावना सांगणार आहेत.

Back to top button