नगर : 219 सदस्यपदांसाठी लवकरच निवडणुका | पुढारी

नगर : 219 सदस्यपदांसाठी लवकरच निवडणुका

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील पारेवाडी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच व जिल्ह्यातील 130 ग्रामपंचायतींच्या 219 सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी लवकरच पोटनिवडणुका जाहीर होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. 9 मार्च 2023 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी जाहीर होणार आहे.

नगर तालुक्यातील पारेगाव ग्रामपंचायतीची थेट सरपंचासह सदस्यपदासाठी 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. सरपंचपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र, सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त आहे. तसेच 2019 ते 2022 या कालावधीत 130 ग्रामपंचायतींच्या 219 सदस्यपदाच्या जागा उमेदवारी अर्जाअभावी तसेच राजीनामा, निधन व अपात्र आदी विविध कारणाने रिक्त आहेत.

या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरु केली. त्यासाठी मतदारयादीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. या मतदार यादीसाठी 5 जानेवारी 2023 मध्ये अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात यावी, असे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. शुक्रवारी (दि.24) प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. या यादीवर 2 मार्च 2023 पर्यत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. उपलब्ध होणार्‍या हरकतींवर सुनावणी होऊन 9 मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी सांगितले.

तालुकानिहाय सदस्यपदाची रिक्त संख्या
अकोले 136, संगमनेर 19, श्रीरामपूर 6, राहुरी 8, नेवासा 10, नगर 4, पारनेर 8, पाथर्डी 1, शेवगाव 10, कर्जत 7, जामखेड 5, श्रीगोंदा 5.

Back to top button