राहुरीची तलाठी कार्यालये टाकणार कात; आ. तनपुरे यांच्या पाठपुराव्याला आले यश | पुढारी

राहुरीची तलाठी कार्यालये टाकणार कात; आ. तनपुरे यांच्या पाठपुराव्याला आले यश

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील वीस गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकामासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राज्य शासनाकडून तलाठी कार्यालय बांधकामासाठी निविदा सूचना जाहिर झाली असून लवकरच बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार तनपुरे यांनी दिली आहे.

राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रूक, डिग्रस, धामोरी बुद्रूक, कात्रड, सोनगाव, निंभेरे, तांभेरे, कानडगाव, आरडगाव, उंबरे, कोंढवड, केंदळ बुद्रूक, मानोरी, पिंप्री वळण, मानोरी आदी वीस गावांमध्ये तलाठी कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनिय झाली होती. पावसाचे पाणी कार्यालयात शिरल्यानंतर शासकीय कागदपत्र भिजत होते. आमदार तनपुरे यांनी ही बाब लक्षात घेत महाविकास आघाडी शासनाच्या काळामध्ये शासनाकडे पाठपुरावा केला होता.

सन 2022 च्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पामध्ये या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तलाठी कार्यालयांची दुरूस्ती, तलाठी व कर्मचार्‍यांची होणारी फजिती पाहता लवकरात लवकर काम सुरू व्हावे, ही मागणी करीत आमदार तनपुरे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. संबंधित गावातील ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांच्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. तलाठी कार्यालयामुळे कामे सुरूळीत होणार आहेत.

4 कोटी 12 लाखांची निविदा प्रसिद्ध
राहुरी तालुक्यातील वीस गावातील तलाठी कार्यालय बांधकामासाठी शासनाकडून 4 कोटी 12 लक्ष 13 हजार 479 रुपयांची अंदाजित निविदा सूचना प्रसारित झाली आहे. 16 फेब्रुवारी रोजी प्रसारित झालेल्या निविदा सुचनेमुळे राहुरी तालुक्यातील वीस गावांमधील तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जागेची अडचण, नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या संबंधित तलाठी कार्यालय आता सुसज्ज होणार आहे.

Back to top button