नगर : ‘स्थायी’त सेनेचा श्री‘गणेशा’ ; सभापती पदासाठी सेनेची जुळवाजुळव | पुढारी

नगर : ‘स्थायी’त सेनेचा श्री‘गणेशा’ ; सभापती पदासाठी सेनेची जुळवाजुळव

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेत स्थायी समितीमध्ये सर्वाधिक सदस्य असूनही चार वर्षे शिवसेनेला सभापतिपदाने हुलकावणी दिली. पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी शिवसेनेचा ‘स्थायी’ श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी नवीन स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी महासभा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांकडून नावे आल्यानंतर महापौर महासभेत ‘त्या’ सदस्यांची नावे घोषित करतील. स्थायी समिती महापालिकेची आर्थिक चावी समजली जाते. विकास कामांचे वाटप करताना स्थायी सदस्यांना झुकते माप मिळते, असे मानले जाते.

16 सदस्यीय स्थायी समितीतील आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने एक फेब्रुवारी ते निवृत्त झाले. त्यांच्याजागी नव्याने आठ सदस्यांना स्थायी सदस्यपदी संधी मिळणार आहे. सध्या पालिकेत राष्ट्रवादी पाच, भाजप चार, शिवसेना पाच, काँग्रेस एक, बसपा एक अशी सदस्य संख्या आहे. त्यातील राष्ट्रवादी दोन, भाजप दोन, शिवसेना तीन, बसपा एक असे सदस्य निवृत्त झाले. नव्याने सदस्य निवडीसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनानुसार शुक्रवारी महासभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेत प्रत्येक पक्षाचे गटनेत्यांकडून बंद लिफाप्यात स्थायी समिती सदस्य निवडीसाठी नगरसेवकांची नावे सुचविली जातील. त्यानंतर महापौर अधिकृतरित्या त्या नावाचे जाहीर वाचन करून निवडीची घोषणा करतील.

स्थायी समितीमध्ये सर्वाधिक नवे सदस्य शिवसेनेचे येणार असल्याने समिती सदस्य नियुक्तीसाठी अनुभवी जुन्यांनी गटनेते व पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. तर, राष्ट्रवादी, भाजपमध्येही सदस्यपदीसाठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठबळावर भाजपची सत्ता आली. त्यामुळे स्थायी समितीत सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला स्थायी समितीचे सभापतिपद मिळाले नाही.  राज्यात महाविकास आघाडी सत्तारूढ झाल्यानंतर महापालिकेतही राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेना अशी युती होत सेनेचा महापौर झाला, पण स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले. आता शेवटच्या वर्षी सभापतिपदाची संधी शिवसेनेला मिळावी यासाठी सेनेकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

सेनेचा सभापती, राष्ट्रवादीला सभागृह नेतेपद

स्थायी समिती सभापतिपद शिवसेना व सभागृहनेता राष्ट्रवादी अशा वाटाघाटी वरिष्ठस्तरावर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सेनेला सभापती पद मिळणार असल्याने रस्सीखेच सुरू झाली आहे. स्थायी समितीत एन्ट्रीपासून त्याची सुरूवात झाली आहे. नालेगावच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ स्थायी समिती सदस्याला सभापतिपदाची संधी मिळून सेनेचे स्थायीत श्रीगणेशा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्थायीचे विद्यमान सदस्य
कुमार वाकळे, विनीत पाउलबद्धे, ज्योती गाडे (राष्ट्रवादी), गौरी नन्नवारे, राहुल कांबळे(भाजप), गणेश कवडे, मंगल लोखंडे (शिवसेना), रुपाली वारे (काँग्रेस).

निवृत्त सदस्य
रिता भाकरे, परशुराम गायवाकड, सचिन शिंदे (शिवसेना), मीनाताई चव्हाण, समद खान (राष्ट्रवादी), वंदना ताठे, रवींद्र बारस्कर (भाजप), नगरसेवक मुद्दसर शेख (बसपा).

Back to top button