नगर : रब्बीच्या सुधारित आणेवारीचा शेतकर्‍यांना ‘शॉक’ | पुढारी

नगर : रब्बीच्या सुधारित आणेवारीचा शेतकर्‍यांना ‘शॉक’

शेवगाव तालुका : वृत्तसेवा :  रब्बी पिकांच्या सुधारित आणेवारीचा शेतकर्‍यांना शॉक बसला असून, ही आणेवारी 74 पैसे लावण्यात आली आहे. या मनमानी आणेवारीबाबत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. तालुक्यातील 79 गावांच्या रब्बी पिकांची नजर अंदाज आणेवारी 75 पैशापेक्षा जास्त लावण्यात आली होती. ती चुकीची असल्याची तक्रार शेतकर्‍यांमधून व्यक्त केली गेल्याने किमान सुधारित आणेवारीत दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने नुकतीच रब्बी पिकांची सुधारित आणेवारी 74 पैसे जाहीर केल्याची पुन्हा एकदा घोडचूक केल्याने शेतकर्‍यांत संताप निर्माण झाला आहे.

प्रत्येक वर्षी नुकसान होऊनही आणेवारीबाबत शेतकरी निमूटपणे शांत राहिला. पंरतु त्याची झळ सोसावी लागल्याने आता शेतकरी जागृत झाला असून, याबाबत शेतकरी संघटना सतर्क झाल्या आहेत. रब्बी पिकांच्या पेरणीपासून आठ दिवसाला बदलणारे वातावरण या पिकांना कितपत पोषक ठरले, हा संशोधनाचा विषय प्रशासनाने कधी विचारात घेतला नाही. येणारे पीक चांगलेच असणार एवढीच बाब समोर घेऊन मनमानी आणेवारी जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे. रब्बीची नजर आणेवारी 75 पैसे लावली होती. याची ओरड झाल्याने सुधारित आणेवारीत फक्त एका पैशाने कमी करून ती 74 पैसे जाहीर केली आहे. यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सुधारीत आणेवारी

सुलतानपूर खुर्द, शहाजापूर, वरुर बुद्रुक, वरुर खुर्द (74 पैसे), अमरापूर, आखेगाव ति, आखेगाव डो, भगूर पिंगेवाडी, भातकुडगाव ( 73 पैसे), शेवगाव, खरडगाव, दहिफळ, ढोरहिंगणी,कर्जत खुर्द, हातगाव, प्रभूवडगाव, खामपिंप्री, लखमापुरी, मुंगी, मजलेशहर, भावी निमगाव, देवळाणे, हिंगनगाव ने, ढोरजळगाव शे, ढोरजळगाव ने, आखतवाडे, मळेगाव ने,वाघोली,वडुले खुर्द बर्‍हाणपूर,निंबेनांदूर,नांदूर विहीरे (72 पैसे), मुर्शतपूर, एरंडगाव, लाखेफळ, बोडखे, ताजनापूर, कांबी, गा.जळगाव, बालमटाकळी,खडके, चापडगाव, मडके, ठाकूर पिंपळगाव, सोनविहीर, भायगाव, देवटाकळी, बक्तरपूर, शहरटाकळी, ढोरसडे, दहिगाव ने, अंत्रे, सुलतानपूर बुद्रुक, घेवरी, रांजणी, जोहरापूर, खामगाव, वडुले बुद्रुक, मलकापूर, गरडवाडी, आपेगाव, सामनगाव, लोळेगाव, आव्हाणे खुर्द, शहापूर, आव्हाणे बद्रुकु ( 71 पैसे), खुंटेफळ, दादेगाव, घोटण, आंतरवाली खु ने, कर्‍हेटाकळी, खानापूर (70 पैसे),तळणी, गदेवाडी, दहिगाव शे, विजयपूर ( 69 पैसे), कुरुडगाव, रावतळे (68 पैसे).

 

Back to top button