श्रीगोंद्यात रंगला कुस्त्यांचा थरार; सिकंदर शेखने जिंकली मानाची गदा | पुढारी

श्रीगोंद्यात रंगला कुस्त्यांचा थरार; सिकंदर शेखने जिंकली मानाची गदा

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : हलगी, डफाचा निनाद, मातीत रंगलेला कुस्तीच्या डावपेचांचा थरार, आखाड्या भोवती जमलेले श्रीगोंदे शहर व परिसरातील ग्रामस्थ, विजयी मल्लांवर होणारा बक्षिसांचा वर्षाव, अशा उत्साही वातावरणात प्रजासत्ताकदिनानिमित्त राजेंद्र म्हस्के व अप्पासाहेब सोनवणे आयोजीत निकाली कुस्तीचे मैदान उत्साहात पार पडले.

महिला मल्लांना प्रोत्साह देण्यासाठी विशेष कुस्त्या पार पडल्या. यामध्ये महिला कुस्तीपटूंनी आपल्या खेळाची कसब दाखवली. मल्लांच्या रंगलेल्या कुस्तीत एकापेक्षा एक सरस डावांनी ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कुस्ती मैदानात महिला कुस्तीपटूंनी आपली कसब दाखवून उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन केले.

मैदानात पाचशे रुपयेपासून पाच लाख रुपयापर्यंत कुस्त्या झाल्या. मैदानात अंतिम कुस्ती पैलवान सिकंदर शेख व पैलवान कमलजीत सिंग यांच्यात झाली. अवघ्या तीन मिनिटांत सिकंदरने कमलजीतला आसमान दाखविले, प्रक्षेकांची मने जिंकली. दोन नंबरची कुस्ती माऊली जमदाडे व पैलवान रविराज यांच्यामध्ये झाली. डावपेच दाखवत माऊलीने रविराजला चीतपट केले.

महिला विभागात झालेल्या कुस्तीत धनश्रीने शिवांजलीला मात दिली. तालुक्यातील सुरेश पालवे, आण्णा गायकवाड, नितिन सोनवणे, दीपक सोनवणे, श्रीकांत रेपाळे, सिद्धार्थ कांबळे आदींच्या कुस्त्या झाल्या. या निकाली कुस्ती पाहण्यासाठी खासदार सुजय विखे, आमदार नीलेश लंके, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, अनिकेत घुले आदी उपस्थित होते. युवानेते प्रमोद म्हस्के यांनी सर्वांचे स्वागत केले. नाना सोनवणे, नंदू रेपाळे, विष्णू राऊत, नितीन मोरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

श्रीगोंदा तालुका पैलवानांचा तालुका आहे. तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून मैदान आयोजित केले. दहा हजार पेक्षा जास्त कुस्तीप्रेमी उपस्थित होते. पुढच्या वेळी यापेक्षा मोठे मैदान भरवू, तर महाराष्ट्र केसरीचे मैदान श्रीगोंद्यात घेऊ.

                                       – राजेंद्र म्हस्के, माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती

Back to top button