नगर : हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा | पुढारी

नगर : हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नेपिअर हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा बनविण्याचा पहिला प्रकल्प शेवगाव येथील तळणी येथे उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यात दरवर्षी तीन हजार कोटीची उलाढाल होणार आहे. देश इंधनात स्वयंपूर्ण व प्रदूषणमुक्त होणार असून, यात शेतकरी केंद्रबिंदू असल्याने देशात क्रांती होणार असल्याची माहिती रणजित दातीर यांनी दिली. शेवगाव तालुक्यात मीरा क्लिन फ्युएल लिमिटेड अंतर्गत ग्रीन गोल्ड क्लिन फ्युएल प्रा.लि.व ग्रीन गोल्ड ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीतर्फे नेपिअर हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा बनवण्याचा पहिला प्रकल्प उभारण्याचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळणी येथे झाला. यावेळी कंपनीचे प्राईम बी.डी.ए. रणजित दातीर व एमपीओ राजेंद्र गायकवाड यांनी ही माहिती दिली. यावेळी भगवान धूत, राहुल मांडे, दादासाहेब पानसरे, विश्वनाथ यादव, विलास पोखरकर, राजगोपाल झंवर, एमपीओ गजानन भोगे, संचालक दत्तात्रय फुंदे, दादासाहेब पाचारणे उपस्थित होते.

सध्या वापरण्यात येणार्‍या कोळशाने पर्यावरण दूषित होते. त्यामुळे अनेकांचे बळी जातात. आपल्या देशाचे 8 लाख करोड रुपये इंधनासाठी आखाती देशाला जातात. मीरा क्लीन प्युएल अंतर्गत निर्माण होणार्‍या जैविक कोळसा निर्मितीने प्रदूषणमुक्त कोळसा तयार होऊन हानी थांबणार आहे. जैविक इंधन,जैविक शेती, जैविक कोळसा हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यात मुख्य घटक शेतकरी असून, त्यामुळे देशाची क्रांती होणार आहे. रासायनिक शेतीने दुर्धर आजार पसरले आहेत, ही परिस्थिती बदलण्यासाठी जैविक शेतीवर भर दिला जाणार आहे.

देशाला इंधन स्वयंपूर्ण व पर्यावरणाला प्रदूषणमुक्त करण्यास सर्वांनी यात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यामुळे अनेकांना रोजगार मिळणार, शेतकर्‍यांच्या घरात पैसा येणार व चांगले शिक्षण मिळणार आहे. लागणारे गवत शेतकर्‍याकडून कंपनी एक हजार रुपये टन हमी भावाप्रमाणे घेणार आहेत. त्याचे एकरी 35 ते 40 टन उत्पादन होते व विनाखर्च वर्षातून त्याच्या 4 कापण्या होतात. कंपनी समाजाचे दायित्व म्हणून 20 टक्के वाटा समाजासाठी वापरणार असल्याची माहिती राजेंद्र गायकवाड यांनी यावेळी दिली.

तालुक्यात 35 ते 40 प्रकल्प
जैव इंधनाच्या माध्यमातून या तालुक्यात दरवर्षी तीन हजार कोटी रुपयांची अर्थव्यवस्था तयार होणार आहे. प्रकल्पाद्वारे दररोज शंभर टन गवतापासून तीस टन कोळसा तयार होणार आहे. असे तालुक्यात 35 ते 40 प्रकल्प उभारले जाणार असून सीएनजी व शेतीवर इतर उद्योग उभारले जाणार आहेत.

Back to top button