नगर : रस्ता दुरुस्तीसाठी अडविला महामार्ग ; मढी फाट्यावर एक तास वाहतूक ठप्प | पुढारी

नगर : रस्ता दुरुस्तीसाठी अडविला महामार्ग ; मढी फाट्यावर एक तास वाहतूक ठप्प

मढी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील मढी ते तिसगाव या दीड किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन होऊन चार महिने झाले, तरीही ठेकेदाराकडून काम सुरू झाले नाही. या रस्ताचे काम त्वरीत सुरू करून पाच किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी शिवसेना व मढी ग्रामस्थांनी पाथर्डी-नगर महामार्गावर मढी फाटा येथे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. चार दिवसात खड्डे बुजवून दीड किलोमीटर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी अधिकार्‍यांनी दिले. दहा वर्षापासून मढी-तिसगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

मढी, मायंबा, वृद्धेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचे व ग्रामस्थांचे या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन चार महिने झाले तरीही ठेकेदार काम सुरू करत नाही. हे काम सुरू करण्याची मागणी शिवसेना व मढी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअभियंता यांच्याकडे करण्यात आली होती. यावर कार्यवाही न झाल्याने गुरुवारी सकाळी दहा वाजता नगर-पाथर्डी महामार्गावर मढी फाटा येथे शिवसेनेचे पदाधिकारी व मढी ग्रामस्थ जमा झाले व त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला.

आंदोलन सुरु होताच सहाय्यक फौजदार कुमार कराड, पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप, अनिल बडे, सुहास बटोळे, ईश्वर बेरड, संदीप गर्जे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या नागरिकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही; तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. मढीचे सरपंच संजय मरकड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मरकड, माजी सरपंच देविदास मरकड, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भाऊसाहेब निमसे, आसाराम ससे, ग्रामपंचायत सदस्य भानविलास मरकड, ग्रामस्थ शरद कुटे, शिवाजी मरकड बाळासाहेब मरकड, भाजपचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब पाखरे, माजी सरपंच बाबासाहेब मरकड, योगेश मरकड, रामदास निमसे, सचिन शेळके, संदीप मरकड, निखिल सतरकर आदींनी सहभाग नोंदविला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी सुभाष केदार यांनी निवेदन स्वीकारून आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .

अधिकारी, ठेकेदाराची मनमानी

संबंधित अभियंता व ठेकेदाराचा मनमानीपणा रस्त्याच्या चांगलाच मुळाशी आला आहे. काम सुरू झाल्यानंतर आंदोलन करणार नाही, असे मढी ग्रामस्थांकडून अधिकार्‍यांना सांगण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराकडून काम सुरू न झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेत रास्ता रोको केला.

Back to top button