नगर : काष्टी सोसायटीचे ऑडिट करणार ! | पुढारी

नगर : काष्टी सोसायटीचे ऑडिट करणार !

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : आमच्याकडे सत्ता आल्यानंतर संस्थेच्या खते, मशीनरी, कापड, मेडिकलसह विविध विभागात मोठा घोटाळा दिसून येत आहे. त्याचे सरकारी लेखापरीक्षण चालु आहे. लवकरच अहवाल आल्यानंतर सभासदांना सत्य सांगू आणि गेली दहा वर्षातील संस्थेच्या कारभाराची चौकशी करुन भांडाफोड करू व भ्रष्टाचार करणार्‍यांकडून नुकसान भरपाई वसुल करू, असा इशाराही संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते यांनी दिला. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील सहकार महर्षी काष्टी सेवा सहकारी संस्थेची 96 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सहकार सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

राकेश पाचपुते म्हणाले, आम्ही आत्ताच सत्तेवर पूर्ण बहुमताने आलोत, हि आपली पहिलीच सभा आहे. परंतु मागील कारभार पाहिला, तर तो हुकूमशाहीचा होता. संस्था सभासदांच्या मालकीची आहे. आम्ही फक्त विश्वस्त म्हणून काम पाहतोय, पण काहींनी मागे स्वतः ची संस्था असल्यासारखे काम करुन सभासदांना तोंडे पाहून कर्ज दिले. आम्ही ते पाप करणार नाही. भविष्यकाळात संस्थेचा सर्व कारभार संगणकीकृत करून शेतकरी सुविधा केंद्रही चालू करणार आहोत. शेतकर्‍यांच्या शेती पिकाला ड्रोन फवारणी यंत्रे घेणार असून याच माध्यमातून संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढवून सभासदांना न्याय देणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.तसेच सहकारी संस्थेच्या माध्यमातूद शेतकर्‍यांना गावपातळीवर सुरळीत कर्जपुरवठा होण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालय सुरू झाल्याने सहकाराला बळकटी मिळाली आहे,असेही आवर्जून सांगितले.

यावेळी अ‍ॅड.विठ्ठलराव काकडे, अरुणराव पाचपुते, डॉ.राम पाचपुते, जालिंदर पाचपुते, प्रकाश शिवराम पाचपुते, पोपटराव पाचपुते आदी काही सभासदांनी मागील कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी सचिव गणेश पाचपुते यांनी सुरुवातीला अहवाल वाचन केले. प्रास्तविक संचालक प्रा.सुनिल माने यांनी केले. सभेला ज्येेष्ठ नेते कैलासराव पाचपुते, जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिलराव पाचपुते, सरपंच साजन पाचपुते, दूध संघाचे माजी अध्यक्ष माणिकराव पाचपुते, उपरसपंच राहुल टिमुणे, उपाध्यक्ष शहाजी भोसले यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने हजर होते.  संचालक सर्जेराव पाचपुते यांनी आभार मानले. मागील वार्षिक सभेत हाणामारी झाल्याने आज पूर्ण बंदोबस्त ठेवला होता.

बोगस कर्जवाटप; दीड कोटींचे नुकसान : पाचपुते

चाळीस वर्षे मी संस्थेचा कारभार पाहताना पारदर्शक काम केले. संस्थेच्या माध्यमातून सामान्य सभासदांना न्याय दिला. चांगल्या कामाची पावती म्हणून संस्थेला विविध पुरस्कार मिळाले. पण काहीजण सत्तेवर असताना कर्ज वाटपात बोगस कारभार केला म्हणून संस्थेचे 1 कोटी 37 लाख रुपये नुकसान झाले, अशी टीका माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी केली.

Back to top button