नगर : कापसाच्या दरात दिवसागणिक घसरण सुरूच ; कापूस उत्पादक शेतकरी आला मेटाकुटीला

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : सध्या कापसाचे बाजारभाव हे उलट्या दिशेने सुरू असून यामध्ये सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. यावर्षीचा विचार केला तर भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकर्यांनी आधीपासूनच कापूस साठवणुकीवर भर दिला आणि त्यामुळे बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी हवा तेवढा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने पुरवठा अत्यल्प असा होत आहे. मागील वर्षी कापसास चांगला दर मिळाल्याने नगर जिलह्यातील अनेक शेतकर्यांनी यंदा कापसाची लागवड केली. पावसाचा फटका बसून उर्वरीत कापूस शेतकर्यांनी हजारो रूपये खर्चुन वेचून घेतला. कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु दिवसोगणिक कापसाचे भाव कोसळत असल्याने शेतकर्यांच्या काळाचा ठोक चुकला आहे.
मागच्या वर्षीचा विचार केला तर कापसाला कधी नव्हे एवढे उच्चांकी दर मिळाले होते. यावर्षी देखील तीच अपेक्षा शेतकरी बंधूंना असल्यामुळे कापूस विक्रीसाठी बाहेरच काढल्या नसल्यामुळे जवळजवळ 80 ते 85 टक्के कापूस अजून देखील शेतकर्यांच्या घरातच आहे. यामुळे जिनिंग मिल देखील अडचणी सापडले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर या ठिकाणी असलेली कापसाचे मागणी देखील खूपच कमी असल्याने कापसाचे दर घसरले आहेत.
जर यावर्षी हंगामाचा विचार केला तर आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये कपाशी खरेदीला साधारणपणे सुरुवात झाली व त्यावेळी साडेनऊ ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला होता. त्या तुलनेत आत्ताची स्थिती पाहिली तर कापूस तब्बल 7500 ते 8000 रुपये क्विंटल वर येऊन पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या दोन महिन्याचा विचार केला तर, त्या तुलनेत आत्तापर्यंत तब्बल अडीच हजारांनी दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. मागच्या वर्षी जो काही कपाशीला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकर्यांचा काहीसा कल हा भाव वाढीच्या दिशेने होता. परंतु ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा कपाशी खरेदीला सुरुवात झाली. तेव्हा नऊ हजार ते दहा हजार दरम्यान बाजार भाव मिळाला. साहजिकच येणार्या काळात देखील भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकर्यांनी कापूस विक्रीसाठी आणलाच नाही. त्यानंतर काही दिवसांनी दर कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जो काही कापूस बाजारपेठेत येत होता तो देखील विक्रीला येणे बंद झाले. त्याच्यामुळे पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रुईची मागणी नसल्यामुळे कापसाचे दर कमी आहेत. सध्या कापसाचा बाजार भाव 7500 ते 8000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत आहे. त्यामुळे आता झालेल्या घसरणीचा विचार केला तर दोन महिन्यात तब्बल अडीच हजार रुपयांनी दर पडले आहेत. शेतकर्यांचा जवळजवळ 80 ते 85 टक्के कापूस घरात पडून राहिल्यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक गणित देखील कोलमडले आहे.
दुसरे महत्त्वाची बाब म्हणजे कापूस घरात पडून राहिल्याने त्याच्या वजनात घट येत राहते व या घटीमुळे देखील शेतकर्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे एकंदरीत पाहता सध्यातरी भाव वाढीची अपेक्षा करणे चुकीचे असून येणार्या काळात कापसाचे भाव वाढतील की घटतील? हे काळच ठरवणार आहे.
आधी पावसाने अन् आता दरामुळे नुकसान
यावर्षी पावसाने अगोदरच बर्याच शेती पिकांचे अतोनात नुकसान केले होते. याला कपाशी हे पीक देखील अपवाद नव्हते. आधीच मोठा आर्थिक फटका बसलेला असताना जे काही पीक हातात आले होते. त्याच्या देखील भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी आता संकटात सापडले आहेत.