पाथर्डीमध्ये बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी नाही | पुढारी

पाथर्डीमध्ये बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी नाही

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील चार भाविक हे तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेऊन शिर्डीकडे जात असताना, पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाटा येथे त्यांच्या व्हॅगनार कारने अचानक पेट घेतला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये कारसह भाविकांची 40 हजारांची रोकड आणि 20 हजारांचा मोबाईल जाळून खाक झाला. दरम्यान, जळालेल्या कारचे सुटे भाग अज्ञातांनी लांबविले.

अभिजीत अशोक जाधव, अमित रामचंद्र पुजारी, महेंद्र विश्वनाथ नमसोले व सुशांत घोडेकर (सर्व रा. गोंधळपाडा, ता. अलिबाग, जि.रायगड) हे वॅगनार कारने (एमएच 06 सीडी 6012) शुक्रवारी तुळजापूरवरून शिर्डी येथे देवदर्शनाला जात होते. पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ विश्वविनायक लॉन्स समोर गाडीतून अचानक धूर निघू लागला. त्यावेळी गाडी थांबवून सर्वजण बाहेर पडताच गाडीने पेट घेतला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने कार जाळून खाक झाली. यामध्ये संबंधित प्रवाशांची 40 हजारांची रोकड आणि 1 मोबाईल जळून खाक झाला.

घटनेची माहिती मिळताच पाथर्डी नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले. पाथर्डी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आप्पासाहेब वैद्य, संदीप बडे, संजय बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गाडी जळाल्यानंतर पहाटे तीन वाजता सर्वजण गाडीपासून थोड्या अंतरावर झोपी गेले. शनिवारी (दि.24) सकाळी 6 वाजता उठल्यानंतर जळालेल्या गाडीचे व्हील, गॅस किट, दरवाजे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अभिजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत जाधव यांनी पाच महिन्यांपूर्वी ही नवीन कार विकत घेतली होती.

Back to top button