नगर : रस्ते दुरुस्तीसाठी साडेबारा कोटी : आमदार मोनिका राजळे | पुढारी

नगर : रस्ते दुरुस्तीसाठी साडेबारा कोटी : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका ( नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर 2022 मध्ये साडेबारा कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. या कामांमध्ये राज्य मार्ग व तीन प्रमुख जिल्हा मार्गाचा समावेश आहे. डिसेंबर 2022 च्या अर्थसंकल्पात सदर कामांना निधी मिळण्यासाठी आ. राजळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना 23 नोव्हेंबर रोजी पत्र दिले होते. या कामामध्ये तिसगाव ते शेवगाव रस्तासाठी तीन कोटी, पाथर्डी ते चिंचपूर इजदे रस्त्यासाठी एक कोटी, आडगाव-जवखेडे-कासार पिंपळगाव रस्त्यासाठी दीड कोटी, मोहरी ते तारकेश्वर गड रस्त्यासाठी दोन कोटी, शेवगाव ते गेवराई रस्त्यासाठी अडीच कोटी, शेवगाव-खुंटेफळ-ताजनापूर-बोडखे रस्त्यासाठी अडीच कोटी, असा एकूण साडेबारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

हे सर्व रस्ते अतिवृष्टीने खराब झाले होते. त्यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती होणे गरजेचे होते. त्याचबरोबर मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुरवणी अर्थसंकल्प जुलै 2022 मध्ये 51 कोटी, त्याचबरोबर विशेष दुरुस्ती अंतर्गत दहा कोटी व मागील आठवड्यात केंद्रीय मार्ग निधी मधून नऊ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे खराब झालेल्या अनेक रस्त्यांची सुधारणा होणार आहे.

त्याचबरोबर पाथर्डी येथील पंचवीस तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी सहा कोटी 75 लक्ष व शेवगाव येथील 34 तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी नऊ कोटी 18 लक्ष निधीची तरतूद या अर्थसंकल्पात झाली आहे. मतदारसंघातील ही सर्व कामे मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, तसेच खासदार सुजय विखे यांचे मोठे सहकार्य मिळाले असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले.

शहरात 80 लाखांचे काँक्रिटीकरण

निधी मंजूर झालेल्या पाथर्डी-चिंचपूर इजदे या रस्त्यामध्ये पाथर्डी शहरातील उपजिल्हा रुग्णालय ते कसबा शनिमंदिर रस्त्याचे 80 लाख रूपये खर्चून काँक्रिटीकरणाचे काम होणार आहे. त्यामुळे पाथर्डी शहरातील नागरिकांनी आमदार मोनिका राजळे यांचे आभार मानले.

Back to top button