अकोले तालुक्यात अनधिकृत पॅथॉलॉजींचा सुळसुळाट ; पॅथालॉजींची चौकशी होणे गरजेचे | पुढारी

अकोले तालुक्यात अनधिकृत पॅथॉलॉजींचा सुळसुळाट ; पॅथालॉजींची चौकशी होणे गरजेचे

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात संसर्गजन्य आजारांनी मोठे थैमान घातले आहे. आदिवासी भागासह बागायती पट्ट्यातील अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र रक्त, लघवीसह इतर तपासण्या करण्यासाठी रुग्णांकडून हजारो रुपये उकळणार्‍या तालुक्यात अनेक पॅथॉलॉजी लॅब या अनधिकृत आहेत. अकोले तालुक्यात केवळ 3 अधिकृत पॅथॉलॉजी लॅब असून तब्बल 20 पॅथॉलॉजी लॅब या अनधिकृत आहे. त्यामुळे डॉक्टरांना देव समजल्या जाणार्‍या रुग्णांची डॉक्टरांच्या सहकार्याने व पॅथॉलॉजी लॅबच्या संगनमताने शुद्ध फसवणूक सुरू आहे. अकोलेच्या आरोग्य विभागाला पॅथॉलॉजीस्ट महाशयांकडून भरगोस ‘आर्थिक डोस’ मिळत असल्याने ते ‘हाताची घडी अन तोंडावर बोट’ ठेवून गपगुमान बसले आहे.

अकोले तालुक्यातून ग्रामीण व शहरी भागात अनधिकृत पॅथॉलॉजी व लॅबरोटरीच्या माध्यमातून काही जण दिवसाढवळ्या बेकायदेशीर व्यवसाय करीत आहेत. एमबीबीएस नंतर एम. डी.(पॅथॉलॉजी) किंवा डीपीबी, डीसीपी, डीएनबी (पॅथॉलॉजी) व तत्सम पदवी प्राप्त नसलेले अनेक बोगस लोक आपली दुकाने थाटून आहेत. नियमानुसार शासनमान्य डिएमएलटी पदवीका प्राप्त पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन हाच रक्त, लघवी नमुना तपासणी करू शकतो. पण काही परवानगी नसलेले लोक स्वतःच: पॅथॉलॉजीच्या स्वाक्षरीसह रिपोर्ट देऊन पैसे उकळत गोरखधंदा करीत आहेत.

‘कोविड-19’ च्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची परवानगी फक्त सरकारी रुग्णालये व आरोग्य केंद्र आणि अधिकृत एम. डी. पॅथॉलॉजीस्ट यांनाच आहे. काही लॅबचालक अनेकदा तर तोंडीच रिपोर्ट सांगत आहेत. लेखी रिपोर्टची मागणी केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. या लॅब अधिकृत नोंदणीकृत नाहीत किंवा अधिकृत व्यक्ती त्यांच्या नोंदणी क्रमांकावर एकापेक्षा जास्त लॅब चालवत आहेत. काही लॅबचालक रिपोर्ट देताना दिशाभूल करण्यासाठी रिपोर्टच्या डाव्या कोपर्‍यात मोठ्या अधिकृत लॅबच्या नावाचाही वापर करताना दिसतात.

अनेकांकडून नियमानुसारची पळवाट शोधून लॅबमध्ये सॅम्पल तपासणीनंतरचे रिपोर्ट मोठ्या लॅबच्या नावाने दिले जातात. सर्व चाचण्यांच्या रिपोर्टवर अशा लॅबच्या नावाचा वापर केला जातो. संसर्गजन्य आजाराचे संकट समोर असताना अशा अनधिकृत लॅबधारकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक करीत आहेत. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद व महाराष्ट्र परावैद्यकीय परिषदेचे रजिस्ट्रेशन एम.डी. वा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजिस्टद्वारा संचालित आहेत काय, याची शहानिशा करत नसल्याने अशा प्रकारचा गोरखधंदा होत आहे. पॅथोलॉजी लॅब व क्लिनिकल लेबोरेटरीत कार्यरत प्रत्येक व्यक्ती मग तो रक्त संकलन करणारा व्यक्ती असला तरी त्यांच्याकडे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदवी, पदविका प्राप्त व पॅरावैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

अकोले तालुक्यातील 3 पॅथॉलॉजी लॅब धारकांची नोंदणी झाली आहे. तर इतरत्र असलेल्या पॅथॉलॉजी लॅबची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत संग्रहित करण्यात येऊन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे.
– डॉ. शामकांत शेटे , तालुका वैद्यकीय अधिकारी. पंचायत समिती, अकोले.

अकोले शहरातील अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबची तत्काळ शोध घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अनधिकृत व अधिकृत पॅथॉलॉजी लॅबचा अहवाल पाठवून  कारवाई करण्यात येणार आहे.
                       – प्रकाश लोळगे, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय अकोले.

Back to top button