सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये गुंडांच्या टोळ्या | पुढारी

सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये गुंडांच्या टोळ्या

सुपा : पुढारी वृत्तसेवा :  नगर-पुणे महामार्गावर असणार्‍या तोशिबा व मिंडा सारख्या कंपन्या आपला प्रकल्प स्थलांतरीत करीत त्यांच्या मायदेशी परतल्या आहेत. गुंडाच्या टोळ्यांमुळे औद्योगीक वसाहतीत दहशत पसरली आहे.त्यामुळे चार हजार लोकांचा रोजगार संपुष्टात आल्याचा मोठा आरोप पारनेर तालुका भाजपा कमीटीने सुपा येथे पत्रकार परिषदेत केला आहे. पारनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी सुपा येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अनेकांनी सुपा औद्योगीक वसाहतीत चाललेल्या कामकाजावर महसूल, पोलिस, कंपनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

कंपनीच्या पायापासुन तर कंपनी उभी राहण्यापर्यत कंपनीचे काम कोणाला दयायचे हे आधीच ठरवले जाते. गुंडाच्या टोळ्यामुळे स्थानिक लोकांना काम मिळत नाही. शिरूर तालुक्यातील टोळ्या औद्योगीक वसाहतीत दहशत करतात. या गोष्टींचा जनतेने अभ्यास करणे गरजेचे आहे. तोशिबा व मायआयडिया प्रकल्प बाहेर का गेला, याचा खुलासा प्रशासनाने जाहीर करण्याची मागणी भाजपा कमिटीने मागणी केली आहे. म्हसणे फाट्याजवळ अंबर कंपनीने हजारो ब्रास उत्खनन केले आहे. याची माहिती महसूल विभागाला समजली. महसूल अधिकारी जाताना मोठ्या अविर्भावात गेले.

या कंपनीला 20 कोटी दंडाची अपेक्षा वाटत होती. अधिकारी बाहेर येताच,त्याच कंपनी अधिकार्‍यांसोबत हातात टाळयावर टाळया देत बाहेर पडले. तसेच बिस्कन कंपनीच्या पाठीमागे रात्रीच्या वेळी उत्खनन चालते.तरी महसूल विभाग डोळेझाक करीत आहे. हे कोणाच्या आशिर्वादाने चालते. अधिकार्‍यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे आरोप पारनेर भाजपा कमिटीने सांगीतले आहे. सुपा औद्योगीक वसाहतीत अनेक ठेकेदार शिरूर तालुक्यातील आहे. मग स्थानिकांना ठेका का मिळत नाही.हे तरूणांचे तयार झालेले ग्रुप, संघटना, प्रतिष्ठाण, संघटीत दादागीरीमुळे कामगार वर्ग, कंपनी मालकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. कंपनीत एखादा गुंड त्रास देत असेल, तर त्या गुंडावर कारवाई उपेक्षित आहे. पण पोलिस प्रशासन कारवाई करीत नाही. प्रशासनाला आमचा शेवटचा इशारा आहे. यापुढे भाजपा कमीटीची ताकद दाखवून देणार, असा इशारा भाजपा कमीटीने दिला आहे.

महसूल, पोलिस प्रशासनाने 15 दिवसांत अपप्रवृत्तीवर कारवाई न झाल्यास भाजपा कमिटी योग्य कारवाई करण्यास समर्थ राहील. असा इशारा पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, उपाध्यक्ष सुजित झावरे, जि.परीषद सदस्य राहुल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, जिल्हा सरचिटणीस सुनिल थोरात, तालुका सरचिटणीस सागर मैड, उदयोजक योगेश रोकडे, उपसरपंच दत्ता नाना पवार,अमोल मैड आदी उपस्थितांनी यावेळी बोलताना दिला.

सुपा औद्योगिक वसाहतीत कंपनी मालक व कामगारांना न्याय मिळावा. उद्योगधंद्यावर लोकप्रतिनिधी गुंडगिरीचा परिणाम होत आहे. बाहेर तालुक्यातील काही संघटना व ग्रुप दहशत करीत आहे. अशा संघटनावर पोलिस, जिल्हाधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ यांनी योग्य समन्वय करून तातडीने रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स लावून गुंडाचा बंदोबस्त करावा. सुजित झावरे जि.प. माजी उपाध्यक्ष

माय आयडीया कंपनी सोडली, तर इतर सर्व कंपन्या दहशतीखाली वावरत आहे. भाजपा पक्षाचे जनतेच्या प्रश्नांसंदर्भात दायित्व आहे.लोकप्रतिनिधीचे प्रतिष्ठान हे कंपनी मालक व कामगारांचा फायदा करण्याऐवजी स्वतःची झोळी भरण्यात दंग आहे. गुंडागर्दीमुळे व हप्तेखोरीमुळे प्रकल्प बाहेर चालले आहेत. याचा सुपा औद्योगिक विकासावर परिणाम होत आहे. याची कुठेतरी दखल अपेक्षित.
                                               – राहुल शिंदे जिल्हा परिषद सदस्य

Back to top button