नगर- मनमाड महामार्गप्रश्नी तरुणांचे पिंडदान | पुढारी

नगर- मनमाड महामार्गप्रश्नी तरुणांचे पिंडदान

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  नगर -मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे शेकडो निष्पाप जिवांचा बळी जाऊनही तोंडातून ब्र शब्द न काढणारे राजकीय नेत्यांसह शासकीय अधिकार्‍यांच्या अनास्थेबाबत आज (शनिवारी) तरूणांचा उद्रेक दिसला. रस्त्यावर जेथे आठवड्यात सहा जणांचा बळी गेला, त्या सुतगिरणी हद्दीत जोगेश्वरी आखाडा येथे दशक्रियाविधीसह पिंडदान करीत तरुणांनी अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान, नगर- मनमाड महामार्गाचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा संतापलेले आंदोलक उग्र भूमिका घेणार आहेत, असा ईशारा यावेळी देण्यात आला.

राहुरी हद्दीतील नगर- मनमाड महामार्ग दुरूस्ती कृती समितीने सतत होणार्‍या अपघातांबाबत वेळोवेळी आंदोलने, निवेदने, रास्ता रोको, अधिकार्‍यांसह राजकीय नेत्यांना घेराव घालूनही रस्त्याचे काम होत नसल्याचे पाहत तरूणांचा संतापाचा कडेलोट झाल्याचे दिसून आले. आठवड्यातच नगर मनमाड हद्दीतील सूतगिरणी हद्दीत एकेरी वाहतूक सुरू असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसल. यामध्ये एका चिमुरड्यासह सहा जणांचा बळी गेल्याने तरूणांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या शासकीय अधिकार्‍यांसह राजकीय नेत्यांच्या निषेधार्थ दशक्रियाविधी व पिंडदान विधी आयोजित केला होता. नगर- मनमाड रस्त्या लगतच तरूणांनी मंडप टाकून प्रशासनाचा निशेष दर्शविणारे फलके तसेच अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहत विधी पूर्ण केला. यावेळी बाबा महाराज मोरे यांचे प्रवचन झाले. प्रवचनाद्वारे शासनाने राष्ट्रीय महामार्गाकडे केलेेले दुर्लक्ष तसेच शासकीय अधिकार्‍यांची अनास्था दर्शविणारी माहिती सांगण्यात आली.

रस्ता कृती समितीचे सदस्य प्रमोद विधाटे यांनी पिंडदान विधी पूर्ण केला. रस्त्यावरील अपघाताने निष्पाप जीवांचा बळी घेतल्याबाबत संताप व्यक्त होऊन मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रस्ता कृती समितीचे सदस्य वसंत कदम म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यासाठी लढा सुरू आहे, परंतु गेंड्याचे कातडे पांघरलेल्या प्रशासनाला समस्या समजेनासी झाली आहे. दरदिवशी अपघातामध्ये कोणी मृत्युमुखी पडतो तर कोणी कायमचे अपंगत्व घेऊन मृत्युशी लढतो. फक्त बघ्याची भूमिका घेतलेल्या संबंधित राजकीय नेते व शासकीय प्रशासनाने जागे व्हावे. रस्त्यावरील सर्व खड्डे योग्यरित्या बुजविण्यात यावे. एकेरी वाहतूक बंद करावी, अशा मागण्या करीत वेळप्रसंगी कोणताही ईशारा न देता आत्मदहन करू, असा ईशारा कदम यांनी दिला.

देवेंद्र लांबे म्हणाले, आता सहनशिलतेचा अंत झाला आहे. फक्त आश्वासन व कोट्यवधी रूपयांचा चुराडा करून नगर- मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीऐवजी चाळण करण्याचा अट्टहास संपवा. निधी खर्च व्हावा म्हणून माती व मुरूम टाकून राष्ट्रीय महामार्गाची डागडूगी झाली. रस्ते खोदून ठेवल्याने एकेरी वाहतुकीची वेळ आली. आंदोलन होऊ नये म्हणून राजकीय नेत्यांनी प्रशासनामार्फत दबाव आणला, परंतु आम्ही कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. पिंडदान व दशक्रियाविधी झाला आहे. आता काम सुरू न केल्यास थेट राहुरी तहसील कार्यालयात खोदकाम करू ,असा ईशारा लांबे यांनी दिला.

शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभूवन यांनी अपघाताला रस्त्याची दुरवस्था करणार्‍या ठेकेदारास कारणीभूत ठरवावे. जखमींना 50 हजार तर मृतांना 5 लाख रूपये नुकसान भरपाई वसूल करावी, असे सांगितले. याप्रसंगी प्रकाश भुजाडी, अनिल येवले, सुनिल विश्वासराव, हसन सय्यद, अभी आहेर, जयसिंग घाडगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलनाप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, सुरेशराव निमसे, शिवचित्रकार हसन सय्यद, शदर म्हसे, दादासाहेब पवार, सतीष घुले, प्रकाश भुजाडी, प्रशांत वाबळे, राजेंद्र बोरूडे, अनिल येवले, दत्ता गागरे, डॉ. रवी घुगरकर, राजेंद्र लोखंडे, सुधाकर आदिक, विजय गव्हाणे, शरद खांदे, साईनाथ बर्डे, सोमनाथ कीर्तने, आबासाहेब वाळूंज, प्रदिप गरड, विक्रम गाढे, वैभव गाडे व तरूणांची गर्दी होती.

‘तहसीलदार साहेब तुम्हीसुद्धा..!’

देवेंद्र लांबे यांनी सांगितले की, रस्त्यावर अपघात घडल्यानंतर वेळोवेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यांना जेथे अपघात होतो तेथे सूचना फलक लावण्यासाठी आदेश देण्याची विनवणी केली, परंतु त्यांनी रस्त्याबाबत गांभीर्य घेतले नाही. आंदोलन सुरू असताना ते फिरकले नाही. कर्तव्यदक्ष असणारे तहसीलदार शेख यांनी रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता तहसील कार्यालयातच खोदकाम करून आंदोलन करू, असा ईशारा लांबे यांनी दिला.

आता तरी जागे व्हा..रत्याचे काम सुरू करा..!

अपघातानंतर मृत कुटुंबियांच्या भावना न समजणार्‍या प्रशासनाने व राजकीय नेत्यांनी नगर- मनमाड रस्त्याबाबत वेळोवेळी स्टंटबाजी केली. केवळ राजकीय आरोप- प्रत्यारोप करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी मृत कुटुंबियांचा अधिक तळतळाट घेऊ नये. शेकडो बळी गेले आता अपघातांची मालिकेला बे्रक द्या. एकेरी वाहतूक थांबवून रस्त्याचे काम आठ दिवसात सुरू करा, अन्यथा आंदोलन हाती घेऊन खोदकाम, आत्मदहन करू, असा ईशारा यावेळी देण्यात आला.

Back to top button