वाळकी : मायबाप सरकार, भरपाई द्या होे ! वर्ष लोटले तरी प्रशासन ठप्प | पुढारी

वाळकी : मायबाप सरकार, भरपाई द्या होे ! वर्ष लोटले तरी प्रशासन ठप्प

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील कामरगाव येथे मागील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अतिवृष्टीने कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याची भरपाई वर्ष सरले तरी मिळाली नाही. त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी तहसील कार्यालयापुढे बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा सरपंच तुकाराम कातोरे, ग्रा.पं. सदस्य संदीप ढवळे यांच्यासह शेतकर्‍यांनी दिला. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कांदा पिकाची मोठी नासाडी होऊन 102 शेतकर्‍यांचे 72 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यात माजी सरपंच वसंतराव ठोकळ यांच्या दोन हेक्टर क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार कृषी सहायक व तलाठ्यामार्फत वस्तूनिष्ठ पंचनामे केले होते. त्यांनी दहा लाख सहव्वीस हजार रुपयांचे अनुदान भरपाई प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविला होता. त्यांनी तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविला होता.

दरम्यानच्या काळात सरपंच कातोरे यांनी तहसील कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने अद्यापि शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. शेतकर्‍यांना न्याय मिळावा, या भावनेतून पुन्हा नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांना कातोरे व ढवळे यांच्यासह शेतकर्‍यांनी निवेदन दिले आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या या निवेदनावर आता सरकार काय निर्णय घेेतेय, याकडे लक्ष लागले आहे.

शेतकर्‍यांच्या कांदा पिकाची नुकसान भरपाई मिळण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहोत . पाठपुरावा करता करता वर्ष सरले तरी भरपाई मिळाली नाही. गेल्या वर्षीची भरपाई मिळाली, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, गावरान कांदा, इत्यादीचे बियाणे खरेदी करता येईल. त्यासाठी प्रशासनाने बळीराजाचा दुवा घ्यावा.
                                                     -किसनराव ठोकळ, शेतकरी कामरगाव

शासकीय काम अन्…

शासकीय कार्यालयात कामासाठी नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. शासकीय काम अन् महिनाभर थांब ’ ही म्हणच सर्वसामान्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. मात्र, कामरगाव येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 72 हेक्टर पिकांची नुकसान भरपाई वर्ष सरले तरी मिळाली नाही. सतत पाठपुरावा करून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आता शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button