वीज बिलासाठी सावकारी वसुली ; शेतीपंपाची वीज खंडित केल्याने रब्बीला फटका | पुढारी

वीज बिलासाठी सावकारी वसुली ; शेतीपंपाची वीज खंडित केल्याने रब्बीला फटका

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीने झोडपल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे . शेतकर्‍यांना आर्थिक मदत करून पूर्वपदावर आणण्याची गरज असताना, शासन वीजबिल वसुलीसाठी शेती पंपाची वीज खंडीत करत आहे. त्यामुळे पाणी देता येत नसल्याने रब्बी पिकांची आशा मावळली आहे. महावितरणच्या सावकरी वसुलीमुळे शेतकरी हैराण झाले असून संताप व्यक्त करत आहेत. नगर तालुक्यातील शेतकर्‍यांची वीज खंडीत न करता त्यांना वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महावितरणच्या कार्यालयाबाहेर गेट बंद आंदोलन केले.

त्याच दिवशी गुंडेगाव परिसरात शेतीपंपाची वीज खंडीत करण्यात आली. वाळकीसह परिसरातील अन्य गावातही महावितरणने वीजबिल वसुली मोहीम सुरू केली असून, त्यासाठी शेतीपंपांची वीज कापण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणचे अधिकारी आणि सरकारने याबाबत नेमकी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल !

महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वीजप्रश्नी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. मध्यप्रदेश सरकारने साडेसहा हजार कोटी रूपये वीज मंडळाला देत तेथील शेतकर्‍यांचे वीजबिल माफ केल्याने त्या सरकारचे अभिनंदन करून राज्य सरकारनेही असा निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. सध्या सरकारमध्ये फडणवीस हेच उपमुख्यमंत्री असून, ऊर्जा खातेही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे तुम्हीच आता शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करा, अशा प्रतिक्रिया शेतकरी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

वीज बंद केल्याने शेतातील तूर, कांद्याचे पीक वाळत आहे. यावर्षी पाऊस होऊनही विजेअभावी ही परिस्थिती निर्माण झाली. सरकार शेतकर्‍यांची गंमत पाहत आहे. आत्महत्यांसाठी केवळ सरकारच कारणीभूत आहे.
                                                            – सागर कासार, शेतकरी, गुंडेगाव

वीज नसल्याने जनरेटर आणला तर रोज एक हजार रुपये भाडे, दोन ते अडीच हजारांचे डिझेल लागते. शिवाय पिकांना एकदा पाणी द्यायला चार ते पाच दिवस लागतात. म्हणजे हा खर्च 15-20 हजारांवर जातो.
                                                      – प्रदीप भापकर, प्रगतशील शेतकरी, गुंडेगाव

 

Back to top button