नगर : कोरोना मृत कर्जदारांची कर्जमाफी? शासनाने माहिती मागविली | पुढारी

नगर : कोरोना मृत कर्जदारांची कर्जमाफी? शासनाने माहिती मागविली

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या योजनांमधून जनतेला दिलासा देण्याचे काम केले जात आहे. आता कोव्हिड 19 मध्ये निधन झालेल्या शेतकर्‍यांच्या थकीत कर्जाबाबतही सहकार विभागाने माहिती बोलावली आहे. शासनाच्या या हालचालींवरून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातून भविष्यात संबंधित कर्ज माफ केल्यास कोरोनात मयत झालेल्या हजारो शेतकरी कर्जदारांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात दोन वर्षे कोरोनाने हाहाकार उडवला. या संकटात अनेक घरातील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची कुटुंबे उद्धवस्त झाली. कमवता माणूस गेल्याने त्यांच्या कुटुंबांना मोठी आर्थिक झळ बसली. यात, अगोदरच सोसायट्या, बँकांतून घेतलेले पिककर्ज, पतसंस्थांचे कर्ज, त्यांचा सुरू झालेला तगादा, यामुळे संबंधित कुटूंब मेटाकुटीस आले आहे. या कर्जापायी मृत शेतकर्‍याच्या कुटुंबावर बेघर आणि भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.

बँक, पतसंस्थांचा जमिनीवर बोजा !

जिल्हा बँकेच्या 298 शाखा आहेत. 1392 वि.वि.का.सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अशाप्रकारे सोसायटीच्या मध्यस्थीतून सुमारे 3 लाख 40 हजार शेतकर्‍यांना अंदाजे 2100 कोटींचे केवळ खरीप कर्ज वाटप झालेले आहे. यापूर्वीही रब्बीसाठी शेतकर्‍यांना बँक, सोसायटीने शेतजमिनीवर नोंद चढवून 2300 कोटींच्या दरम्यान कर्ज पुरवठा केला आहे. तर काहींनी पतसंस्थांकडेही घरदार गहाण ठेवून कर्ज घेतलेले आहे. दुर्दैवाने यातील शेकडो शेतकरी कोरोनात मृत झाले आहेत

जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या कर्जाबाबत सहकार आयुक्तांनी आम्हाला माहिती मागावली आहे. त्यानुसार तालुक्याच्या ठिकाणी सहायक निबंधक कार्यालयातून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींची, त्यांच्या कर्जाची आवश्यक ती माहिती संकलित केली जात आहे. लवकरच ती माहिती आयुक्तांकडे पाठविली जाईल.
                                                             -गणेश पुरी, उपनिबंधक, नगर

काय काय माहिती घेणार !

सहकार विभागाकडून पतसंस्थेचे, नागरी बँकेचे, संस्थेचे नाव, कोव्हीडने मृत झालेल्या शेतकर्‍याचे नाव, मंजूर कर्जाची रक्कम, तारण मालमत्तेचा तपशील, थकीत कर्जाची एकूण रक्कम, एनपीए वर्गवारी, वसुलीची सद्यस्थिती माहिती संकलित करण्याच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी केल्या आहेत.

कोरोनामुळे 16 हजार 850 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाटेत अनेकांना मृत्यू झाला. यात शासनाच्या पोर्टलवर 7234 जणांना कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्षात 16 हजार 850 जणांना कोरोनाने मृत्यू झाल्याची नातेवाईकांनी माहिती सादर केलेली आहे. त्यामुळे कोणती आकडेवारी अधिकृत हे समजू शकलेले नाही.

राष्ट्रीयकृत बँकांचे कानावर हात !

एकीकडे सहकार विभागातून कोरोनात मृत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले असताना, दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र आम्हाला असे कोणतेही आदेश नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे स्टेट बँक, महाराष्ट्र बँक इत्यादी राष्ट्रीयकृत बॅँकेचे पिककर्ज डोक्यावर असणारे ‘त्या’ शेतकर्‍यांचे कुटुंब संभ्रमात पडले असून, दररोज ‘त्या’ शेतकर्‍याची विधवा पत्नी, छोटी मुले बँकेचे उंबरठे झिजवताना दिसत आहे.

कर्जमाफी की अन्य काही उपाययोजना?

कोरोनामुळे निधन झालेल्या व मालमत्ता तारण असलेल्या कर्जदार शेतकर्‍यांची माहिती सहकार विभागाने संकलित करण्याचे आदेश केले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी सहकारी बँका, पतसंस्थांच्या थकीत कर्जदारांची यादी तयार केली जात आहे. सहायक निबंधक कार्यालयातून ही माहिती गोळा केली जात असून, ती माहिती जिल्हा उपनिबंधक आणि तेथून आयुक्तांकडे सादर केली जाणार आहे.

Back to top button