आयुक्त साहेब, आम्ही महापालिका हद्दीतच राहतो ! कर भरूनही नागरिकांना मिळेनात सुविधा | पुढारी

आयुक्त साहेब, आम्ही महापालिका हद्दीतच राहतो ! कर भरूनही नागरिकांना मिळेनात सुविधा

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्रभाग आठमधील गांधीनगर येथील नागरिक समस्यांच्या विळख्यात अडकले आहेत. ड्रेनेज, सांडपाणी, रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ड्रेनेज व सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. पंकज जावळे व सभापती कुमार वाकळे यांनी प्रभागातील समस्यांची पाहणी केली. याप्रसंगी ‘आयुक्त साहेब आपल्या दारी’ असे म्हणून दवंडी देण्यात आली होती. प्रभाग आठमधील गांधीनगर परिसरातील विविध नागरी समस्यांची पाहणी सभापती कुमारसिंह वाकळे व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केली.

सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले, गांधीनगर भागातील मूलभूत प्रश्न मी नगरसेवक असताना सोडविले होते. आता मी नगरसेवक नाही पण माझी या नागरिकांशी नाते जोडलेले आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी या भागाची पाहणी केली आहे. लवकरच विकास कामांचे अंदाजपत्रक बनविले जाईल व टप्प्याटप्प्याने प्रश्नमार्गी लावण्यात येतील.
शहर अभियंता सुरेश इथापे म्हणाले, सभापती कुमार सिंह वाकळे व आयुक्त पंकज जावळे यांनी गांधीनगर परिसरातील समस्याची पाहणी केली आहे.

ड्रेनेज व सांडपाण्याचा प्रश्नमार्गी लागण्यासाठी भुयारी अमृत गटार, भेज टू योजना लवकरात मंजूर होणार आहेत. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्त्याच्या कामांसाठीही अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.

नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा
रस्ता नसल्याने मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूल बस येत नाही याचबरोबर गॅस टाकीचे वाहन ही येत नाही. आम्ही महानगरपालिकेकडे फेज टू पाणी योजनेचे कनेक्शन घेण्यासाठी पैसेही भरले आहेत. तसेच नियमित करही भरतो तरीसुद्धा पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही, अशा तक्रारी मांडल्या.

Back to top button