संगमनेर : पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडून मुलाचा मृत्यू | पुढारी

संगमनेर : पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडून मुलाचा मृत्यू

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : म्हाळुंगी नदीवर आईसोबत गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल (रविवारी) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी व राजापूर धरणाखालील परिसरात घडली. साहिल संतोष कातोरे (वय 13 , रा. नांदुरी दुमाला, ता.संगमनेर, हल्ली रा. एमआयडीसी, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकणारा साहिल कातोरे हा मुलगा सकाळी आईसोबत म्हाळुंगी नदीत कपडे धुण्यास गेला होता. इतर लोक नदीमध्ये आंघोळ करीत असल्याने साहिल पाण्यात आंघोळीस उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. ही वार्ता सर्वत्र पसरली.

ही माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे, गुंजाळवाडीचे उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, राजापूरचे उपसरपंच बादशहा हासे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय महाले, सचिन उगले, ग्रामसेवक परमेश्वर आहेर हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
जलतरणपटू अ‍ॅड. सदाशिव थोरात यांच्यासह परिसरातील ज्ञानेश्वर हासे, बाबजी हासे या पोहणार्‍या तरुणांनी बुडालेल्या साहिल कातोरे याचा शोध सुरू केला. काही वेळाने त्याला नदीपात्रातून बाहेर काढले. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत संगमनेर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Back to top button