नगर : शिक्षक बँकेसाठी आज मतदान, उद्या होणार मतमोजणी; एकूण 10 हजार 465 मतदार | पुढारी

नगर : शिक्षक बँकेसाठी आज मतदान, उद्या होणार मतमोजणी; एकूण 10 हजार 465 मतदार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  प्राथमिक शिक्षक बँकेचे, तसेच विकास मंडळाचे नवे कारभारी निवडीसाठी आज रविवारी (दि.16) मतदान होत आहे. सत्ताधार्‍यांसह प्रतिस्पर्धी मंडळांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात असल्याने, निकालाकडे नगरकरांसह राज्याचे लक्ष लागले आहे. सोमवारी दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शिक्षक बँकेच्या 1275 कोटींच्या ठेवी आहेत. संस्थेचे 10 हजार 465 सभासद मतदानास पात्र आहेत. बापूसाहेब तांबे गटाकडे बँकेची सत्ता आहे. आज रविवारी 21 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. बँकेच्या सत्तेसाठी सत्ताधारी बापूसाहेब तांबे गट, विरोधी गटाचे नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी, डॉ संजय कळमकर, राजेंद्र शिंदे यांनी जोरदार ताकद लावली आहे. सर्वच नेत्यांनी कुठं फोडाफोडीची रणनीती राबविण्यासोबतच सभासदांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. शिक्षक बँकेचे मतदार आहेत. तो बुद्धिमान असल्याने मतदानातून देखील ते ‘करेक्ट कार्यक्रम’ करत असल्याचे यापूर्वीचा अनुभव आहे.

बँकेच्या 21 जागांसाठी 10 हजार 465 आणि विकास मंडळाच्या 18 जागांसाठी 10 हजार 738 सभासद नेमकी कोणाला संधी देणार, याविषयी उत्कंठा वाढली आहे. विकास मंडळाची सत्ता रोहोकले गटाकडे आहे. प्रत्येक तालुक्यातील केंद्रावर मतदान होणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या मतपत्रिका स्वतंत्र असल्याने क्रॉसव्होटिंग सोपे जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. शिक्षक बँकेसोबतच विकास मंडळाच्या 18 जागांसाठीही मतदान होत आहे. या मंडळाच्या सत्तेसाठीही चार मंडळे निवडणूक रिंगणात आहे. 18 जागांसाठी चार मंडळांचे 72 उमेदवार नशिब अजमावत असून, सत्तेचा निकाल सोमवारी सायंकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

Back to top button