आमच्या नादाला लागू नका : आमदार नीलेश लंके | पुढारी

आमच्या नादाला लागू नका : आमदार नीलेश लंके

टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे सरकार असताना पारनेर मतदारसंघात रस्त्यांसाठी सर्वाधिक निधी मंजूर केला असून, याचे श्रेय घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. आधी काम करून दाखवावे आणि मग श्रेय घ्यावे, असा टोला आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना लगावला आहे. ना आमचा साखर कारखाना, ना शैक्षणिक संस्था, त्यामुळे आमच्या नादाला लागू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. वासुंदे व टाकळी ढोकेश्वर येथील विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, राजेंद्र चौधरी, गुरुदत्त पतसंस्थेचे अध्यक्ष बा.ठ.झावरे, बाळासाहेब खिलारी, बापू शिर्के, सरपंच अ‍ॅड.राहुल झावरे,अंकुश पायमोडे, रावसाहेब झावरे, बाळशिराम पायमोडे, महेश ढुस, भाऊसाहेब झावरे, सरपंच अरूणा खिलारी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी आ.लंके म्हणाले, काम करायचे नाही फक्त टीका करायची एवढाच तुमचा धंदा आहे. आमच्यावर टिका करणारांचे समाजासाठी योगदान काय? काही लोकांचा राजकारण करायचा हा धंदा आहे. बाजार बुनग्यांनी आ. लंकेंवर टीका करू नये. येणार्‍या निवडणुकीत आम्ही कोण आहोत, हे दाखवून देणार आहे. खादीवाले लोक आपल्याकडे आले असता खिशातून बोटाने नोट काढणारे आपण आहात, अशी टीका त्यांनी सुजित झावरे यांचा नामोल्लेख टाळून केली. आज आम्ही सरकारमध्ये नाही. परंतु, ज्यावेळी पहिल्या पाचमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून असेल, त्यावेळी दाखवून देऊ, असा इशाराही आमदार लंके यांनी दिला. सूत्रसंचालन दत्तात्रय निवडुंगे व विक्रम झावरे यांनी केले. आभार बाळासाहेब खिलारी यांनी मानले.

 

Back to top button