टाकळीभान : बसचालकास पिस्तूल दाखविणार्‍यास अटक | पुढारी

टाकळीभान : बसचालकास पिस्तूल दाखविणार्‍यास अटक

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : पिस्तुलचा धाक दाखवून बस चालकास गोळ्या घालण्याची धमकी देणार्‍या एकास पोलिसांनी जेरबंद केले. लक्ष्मण शिवाजी आरे (रा. गुलटेकडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे हा प्रकार घडल्याची माहिती डिवायएसपी संदीप मिटके यांनी दिली. टाकळीभान येथे (दि. 30) सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास औरंगाबाद- शिर्डी जाणारी बस (क्र. एम एच 40 बी एल 4180) श्रीरामपूरकडे प्रयाण करीत असताना टाकळीभान शिवारात वीट भट्टीजवळ स्विफ्ट कार (क्र. एम एच 16 ए बी 4046) मधील एकाने बसला कार आडवी लावून, ‘स्विफ्ट कारला कट का मारला?’ असे म्हणत स्वतः जवळील पिस्तूल काढून ते बस चालकावर रोखत जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, सुदैवाने याच बसमध्ये प्रवास करणारे पोलिस काँ. विलास उकिरडे यांनी समय सूचकता दाखवत या घटनेची माहिती मोबाईलवरून डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांना दिली. ते त्वरीत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. टाकळीभान परिसरात कारचा सिने स्टाईल पाठलाग करून स्विफ्ट कार (क्र. एम एच 16 ए बी 4046) सह लक्ष्मण शिवाजी आरे (वय 32 वर्षे, रा. गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे) यास पिस्तुलसह ताब्यात घेतले.

या कारवाईबाबत डि. वाय.एस. पी. संदीप मिटके यांच्यासह पोलिस पथकाचे टाकळीभान ग्रामस्थ व प्रवाशांनी कौतुक केले. दरम्यान, पिस्तुलचा धाक दाखविणार्‍याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये बस चालक संजय फ्रान्सिस गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी संदीप मिटके पोलिस उपनिरीक्षक बोरसे, हे. काँ सुरेश औटी, भारत जाधव, पो.काँ विलास उकिरडे यांनी केली.

प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास!
या घटनेत स्विफ्ट कार चालकाने बस चालकावर फायरिंग करण्याची धमकी दिल्याने बसमधील प्रवासी भयभीत झाले. या प्रकारामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र डि.वाय.एस.पी. संदीप मिटके यांनी प्रसंगावधान राखत आरोपीस शिताफिने ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला अन् बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला!

Back to top button