श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत आणखी 32 तोळे बनावट सोने | पुढारी

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत आणखी 32 तोळे बनावट सोने

नगर; पुढारी वृत्तसेवा: श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बनावट सोनेतारण प्रकरणी रविवारी अटक केलेल्या सचिन लहानबा जाधव (रा. निमगाव वाघा, ता. नगर) याच्या पतसंस्थेत असलेल्या खात्यात सुमारे दहा लाखांचे 32 तोळे बनावट सोने आढळून आले आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या फसवणुकीचा आकडा 89.19 लाखांवर पोहचला आहे. आतापर्यंत 39 खाती पोलिसांनी तपासली असून, त्यामध्ये 2862 ग्रम म्हणजेच, तीन किलोच्या आसपास बनावट सोने असल्याचे समोर आले आहे.

शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारणाची तपासणी सुरू असतानाच, संत नागेबाबा पतसंस्थेतील बनावट सोनेतारण प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. या प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअर अजय कपालेसह त्याचे साथीदार सुनील ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सीताराम कदम या चौघांना नागेबाबाच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सचिन लहानबा जाधव याला पोलिसांनी अटक केली असून, सोमवारी रात्रीपर्यंत झालेल्या तपासणीत जाधव याच्या खात्यात 32 तोळे बनावट सोने आढळून आले. तसेच, जाधवच्या म्हणण्यानुसार, पतसंस्थेत बनावट तारण ठेवून कर्ज उचलेल्या काही खात्यांची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे.

रविवारी अटक केलेल्या सचिन जाधव याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दि.27 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, सर्व आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने आज (दि.27) त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

Back to top button