नगर : वाळू तस्करी झाल्यास सर्कल, तलाठी सस्पेंड : महसूलमंत्री विखे | पुढारी

नगर : वाळू तस्करी झाल्यास सर्कल, तलाठी सस्पेंड : महसूलमंत्री विखे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अनधिकृत वाळूउपसा आणि वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश यापूर्वीच राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. तरीही उपसा आणि वाहतूक सुरु असल्याचे आढळून आल्यास संबंधित गावचे तलाठी आणि मंडलाधिकारी यांना तत्काळ निलंबित केले जाईल. तसेच संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना देखील कारणे दाखवा नोटिसा बजावली जाणार असल्याचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.  राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीने झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या जिल्ह्यातील नुकसानीचा तसेच पशुधनाच्या लम्पी आजाराची सद्यस्थिती आणि उपाययोजनांनाचा आढावा घेतला.

आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ व इतर अधिकारी उपस्थित होते.
अनाधिकृत वाळूउपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी वाळूतस्करांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले तरीही जिल्ह्यात अनधिकृतपणे वाळूउपसा आणि वाहतूक सुरुच आहे. अद्याप एकाही वाळूतस्करावर गुन्हे दाखल नाहीत, याकडे पत्रकारांशी लक्ष वेधले असता, महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, अनधिकृत वाळूउपसा व वाहतूक रोखण्यासाठी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्यभरातील महसूल अधिकार्‍यांना दिलेले आहेत. तरीही असे गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित गावचे तलाठी व मंडलाधिकारी यांना निलंबीत करुन तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावली जाणार आहे. या वाढत्या प्रकारला आळा घालण्यासाठी गावकर्‍यांनी देखील सतर्क असणे गरजे आहे. असे त्यांनी नमूद केले.

वाळूलिलावाला प्रतिसाद मिळत नाही. मात्र, अनधिकृत उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. हे गैरप्रकार रोखण्यासाठी महिनाभरात नवीन वाळूधोरण जाहीर केले जाणार आहे. या नवीन वाळूधोरणामुळे राज्यात गौणखनिजाबाबत पारदर्शकता निर्माण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात 616 जनावरे दगावली
महसूलमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील 30 जिल्ह्यातील 231 तालुक्यांतील 1 हजार 666 गावांत लम्पीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे 19 हजार 160 पशुधन बाधित झाले असून, आतापर्यंत 616 जनावरे दगावली आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाबरोबरच सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 1 हजार विद्यार्थ्यांची देखील मदत घेतली जाणार आहे. राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांच्या रिक्त जागा येत्या महिनाभरात भरण्यात येणार आहेत.

9 लाख जनावरांचे होणार लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 658 पशुधन लम्पीमुळे बाधित झाले असून, 54 पशुधन दगावले आहे. खबरदारी म्हणून 9 लाख 11 हजार 178 जनावरांनाचे लसीकरण केले जाणार असून, आतापर्यंत 6 लाख 51 हजार पशुधनांचे लसीकरण पूर्ण झाले. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 700 पशुवैद्यकीय डॉक्टरांची टीम तैनात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

बाधित पशुधनासाठी कॅम्प
अनेक ठिकाणी शेतकरी बाधित पशुधन सोडून देत आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बाधित पशुधनासाठी कॅम्प सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पुढे येणार्‍या सामाजिक संस्थांना जिल्हाधिकारी मान्यता देतील, असे त्यांनी सांगितले.

Back to top button