नगर : तत्काळ हजर व्हा ! सीईओंनी दिला इशारा | पुढारी

नगर : तत्काळ हजर व्हा ! सीईओंनी दिला इशारा

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेमध्ये गेल्या महिन्यापूर्वी झालेल्या स्थानांतरण प्रक्रियेत अन्य विभागात पदस्थापना होऊनही अद्याप अनेक कर्मचार्‍यांना विभागप्रमुखांनी सोडले नाही. याबाबत सीईओ आशिष येरेकर यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित कर्मचार्‍यांनी तत्काळ आपल्या नेमणुकीच्या विभागात हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक कर्मचार्‍यांना स्थानांतरणाने पदस्थापना देण्यात आली होती. संबंधित कर्मचार्‍यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत काही कर्मचार्‍यांना विभागप्रमुखांनी कार्यमुक्त केलेले नसल्याचे सीईओ आशिष येरेकर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबत गंभीरपणे दखल घेवून दि. 2 सप्टेंबर रोजी आदेश काढला आहे.

त्यानुसार कर्मचारी संजय कुटे हे शिक्षण विभागातून आरोग्य, बाजीराव वारूळे हे आरोग्य विभागातून ग्रामपंचायत, चिमाजी धनवळे हे शिक्षण विभागातून आरोग्य, सलिम शेख हे शिक्षण विभागातून आरोग्य, मिथून बोरुडे हे आरोग्य विभागातून शिक्षण, संदीप काळे हे आरोग्य विभागातून शिक्षण आणि महेश येनगंदुल हे आरोग्य विभागातून शिक्षण विभागात स्थानांतरणाने गेले आहेत. मात्र, त्यांना कार्यमुक्त केलेले नसल्याने दि. 2 रोजी सीईओंनी आपल्या आदेशान्वये संबंधित कर्मचार्‍यांना पदस्थापनेवर हजर होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे. सदर आदेशाचा अवमान केल्यास कार्यवाही करण्याचा इशारा सीईओंनी विभागप्रमुख आणि संबंधित कर्मचार्‍यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

Back to top button