नगर : अग्निवीर भरतीसाठी होणार आठ मेळावे | पुढारी

नगर : अग्निवीर भरतीसाठी होणार आठ मेळावे

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : अग्निवीर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या सहा जिल्ह्यातील तरूणांनी हजारोच्या संख्येत नोंदणी करून मोठा प्रतिसाद दिला आहे. संरक्षण दलाच्या मुख्य कार्यालयाद्वारे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली, दमण-दीव या राज्यातील तरूणांसाठी एकूण आठ अग्निवीर भरती मेळावे घेतले जाणार आहेत. त्यापैकी औरंगाबाद व नगर जिल्ह्यामध्ये अग्निवीर भरतीचे पुरूष मळावे यशस्वीरित्या सुरू आहेत. उर्वरीत पाच मेळावे हे पुरूष उमेदवारांसाठी तर एक मेळावा हा महिला उमेदवारांसाठी असणार असल्याची माहिती अग्निवीर भरती प्रक्रियेचे अतिरीक्त महासंचालक तथा सैन्य दलाचे मेजर जनरल अजय सेठी यांनी दिली.

अग्निवीर भरतीसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पत्रकारांसह कॅम्प परिसराची पाहणी केली. निवड झालेल्या व परिक्षार्थी अग्निवीर तरूणांची माहिती व प्रक्रियेची सविस्तर माहिती प्रत्यक्षरित्या अधिकार्‍यांनी पत्रकारांना दिली. सैन्य दलाचे अधिकारी सेठी यांनी सांगितले की, जुलैमध्ये तरूणांनी ऑनलााईन नोंदणी केलेली आहे. विद्यापीठातील अग्निवीर भरतीसाठी सहा जिल्ह्यातून 68 हजार तरूणांनी नोंदणी केलेली आहे. तरूणांचा उत्साह हा देशासाठी महत्वाचा आहे. भरतीसाठी आलेल्या तरूणांच्या पात्रता चाचणी, मैदानी चाचणी, शारिरीक मोजमाज चाचणी, कागदपत्र पडताळणी, बायोमॅट्रीक पडताळणी व वैद्यकीय तपासणी सर्व प्रक्रिया पारदर्शक होत आहे. 1600 मिटर धावणे, पुल अ‍ॅप्स, लांब उडी, नागमोडी चालणे या मैदानी चाचण्या आहेत.

ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर उंची, वजन व छातीचे मोजमाप होते. कागदपत्र पडताळणी होऊन बायोमॅट्रीक तपासणीमध्ये हाताचे ठसे, डोळ्यांचे बुबुळाचे स्कॅनिंग होऊन बोगस उमेदवाराच्या भरतीला आळा घालण्यात आलेला आहे. दुसर्‍या दिवशी मेडिकल तपासणी होते. या सर्व प्रक्रियेत यशस्वी ठरल्यानंतर वैद्यकीय तपासणीमध्ये यशस्वी झालेल्या तरूणांची लिस्ट प्रसारित कली जाणार आहे.

त्या लिस्टमध्ये निवड झालेल्या तरूणांना लेखी परिक्षेचे ओळखपत्र दिले जाईल. साधारण डिसेंबर 2022 मध्ये लेखी परिक्षा होऊन मेरीट मध्ये आलेल्या अग्निवीर तरूणांना 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी लष्कराच्या रेजिमेंटल सेंटरमधये पाठविले जाणार असल्याचे सेठी यांनी सांगितले.

राहुरीतील भरती 11 सप्टेंबरपर्यंत

यांत्रिकी, तांत्रिकी, लिपिक, स्टोअर किपर, स्वयंपाकी, ट्रेडमन, शिपाई अशा अनेक पदासाठी सैन्य दलात भरती केले जाणार आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्त्या दिल्या जाणार आहे. औरंगाबादमध्ये पहिले कॅम्प 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत सुरू आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, पुणे, सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी 13 ऑगस्ट पासून सुरू झालेली अग्निवीर भरती यशस्वीरित्या सुरू आहे. अग्निवीर भरतीसाठी दैनंदिन 5 हजार तरूण विद्यापीठ हद्दीमध्ये दाखल होत आहेत. हा मेळावा 11 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.

देशसेवेसाठी तरुणांना मोठी संधी

लाखो तरूण देशसेवेचे स्वप्न पाहत आहे. अग्निवीर तरूणांसाठी स्वप्नपूर्ती करणारी प्रक्रिया ठरत आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क भरतीसाठी आकारले जात नाही. तरूणांनी निसंकोचपणे भारतीय सैन्य दलाच्या संकेतस्थळावरून नोंदणी करून जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन जनरल मेजर अजय सेठी यांनी केले.

अग्निवीरमुळे स्वप्नपूर्तीची अपेक्षा : रोहित आढाव

इयत्ता 10 वी पासून मी सैन्य दलाच्या भरतीचे स्वप्न पाहत होतो. अग्निवीर भरतीने त्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. देशसेवेसाठी चार वर्ष का होईना संधी मिळत असल्याचे समाधान आहे. त्यामुळे अग्निवीर होण्यासाठी माझे सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया भरती प्रक्रियेत सहभागी झालेला तरूण रोहित आढाव याने दिली.

कमीत कमी मानवी हस्तक्षेप

अग्निवीर भरती ही पारदर्शक होण्यासाठी कमीत कमी मानवी हस्तक्षेपाची असून स्वयंचलित संगणकीय गुणांकण देत पूर्ण होणार आहे. पारदर्शकतेने ही भरती प्रक्रिया होत असल्याची माहिती सैन्य दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

Back to top button