नगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी रिपाइंचे उपोषण | पुढारी

नगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी रिपाइंचे उपोषण

नगर, पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरात उभारणीस तत्काळ मंजुरी मिळावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले) सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले. याबाबत वनविभागाच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्यानंतर रिपाइंने उपोषण मागे घेतले.

श्रीरामपूर शहरातील रेल्वेस्टेशनच्या शेजारी नगरपालिका प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे. डॉ. आंबेडकर यांचे स्मारक व पुतळा उभारणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगरपालिकेने पाठविला आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ रिपाइंचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. या उपोषणात भीमा बागुल, अजय साळवे, विजय पवार, मनोज काळे, सुनील शिरसाठ, रमेश अमोलिक, करण कोळगे, समाधान नरोडे आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले.

दुपारी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे व सुरेंद्र थोरात यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची भेट घेतली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. ती जागा वन विभागाची आहे. त्याठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसविण्यास परवानगी मिळणार नाही. दुसरी जागा निश्चित करा. पुतळा बसविण्यास परवानगी देतो, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी म्हटले. परंतु, कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी लावून धरली. जर नगरपालिकेने तसा प्रस्ताव सादर केल्यास तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले.या आश्वासनानंतर रिपाइं कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

Back to top button