नगर : नगरचे अहिल्यानगर नामांतर करा | पुढारी

नगर : नगरचे अहिल्यानगर नामांतर करा

नगर, पुढारी वृत्तसेवा : भारताचे शुद्धीकरण करताना धर्मांधांनी देशातील जिल्हे, शहरांना जी नावे दिली होती, ती बदलून मूळ नावे धारण करणे गरजेचे आहे, तसेच अनेक अपभ्रंशांचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. ज्यांच्यामुळे काशी विश्वनाथाचा घाट सापडला, ज्यांनी देशभर धर्म रक्षणाचे कार्य केले, ज्यांचा जन्म नगर जिल्ह्यात झाला, त्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन नगरचे अहिल्यानगर असे शुद्धीकरण करावे, अशी मागणी हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केली.

हिंदूराष्ट्र सेनेच्या एकदिवसीय अधिवेशन आणि राष्ट्रनिर्माण संकल्प सभेसाठी ते नगरला आले होते. ह. भ. प. कडूभाऊ गवांदे महाराजांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास अमोल गांधी, प्रदीप पंजाबी, गौतम कराळे, उत्तमराव वाबळे, माजी सरपंच विश्वास गर्जे, पोपट घोरपडे, विजय पवार, रावजी नांगरे, आकाश भोंडवे, निखिल धंगेकर, अजिंक्य ढोबळे, आकाश वाबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाथांच्या चैतन्य समाध्यांचा आशीर्वाद

देसाई म्हणाले की, नगर जिल्हा पूर्णक्षेत्र आहे. नाथांच्या चैतन्य समाध्यांचा आशीर्वाद असलेल्या याच जिल्ह्यातून हिंदूत्वाची मशाल देशभर धगधगत राहणार आहे. हिंदूराष्ट्र हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आम्हाला छत्रपती शिवरायांचे सार्वभौम हिंदूत्वाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. कोणताही राजकीय पक्ष, नेत्यांची झेलेगिरी करणारे आमच्या संघटनेत नकोत. मात्र, राजकीय जोडे बाहेर काढून हिंदूत्वाच्या पवित्र मंदिरात येणार्‍या प्रत्येकाचे स्वागतच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आकांड-तांडव करणार्‍यांना वेळीच ठेचायचे आहे.

बिहार पोलिसांनी ‘पीएफए’चा भांडाफोड केला. सन 2047 पर्यंत भारत इस्लामिक राष्ट्र बनवायचा त्यांचा उद्देश आहे. त्यामध्ये एक निवृत्त पोलिस निरीक्षकाचा सहभाग आहे. काश्मिरची कारवाई होताच, एक जिल्हाधिकारी नोकरीचा राजीनामा देऊन आम्हाला काश्मिर स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र हवे होते, असे आयएएस दर्जाचा अधिकारी म्हणतो, यातूनच भारतविरोधी षडयंत्रे स्पष्ट होतात. अफझलखान वधास विरोध असणार्‍यांना आमचा विरोध आहे. आमच्या पुढच्या पिढीला जिहादाशी सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आजचा लढा आहे.

‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील भारतात मुस्लिमांना थारा देऊ नये, हेच स्पष्ट केले आहे. काश्मीर फाईल्स या 30 वर्षांपूर्वीच्या घटना आहेत. 1947 पूर्वी भारताचे तुकडे होतील, असे कोालाही वाटले नव्हते. भारताचे आजवर झालेले सगळे तुकडे केवळ इस्लामिक आतंकवादामुळेच झाले आहेत. या सगळ्याचे बिंग फोडून आता अंतरात्मा जागृत करण्याची वेळ हिंदूंवर आली आहे. सर्व मशिदींवरील भोंगे बेकायदेशीर असताना, तिकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन गणपतीचा मंडप किती फुटांचा घालायचा, हे सांगते. मात्र, अशा अधिकार्‍यांना सांगतो, आता सरकार बदलले आहे. तुम्हीही बदला, असा इशारा देसाई यांनी प्रशासनालाही दिला.

नुपूर शर्मा यांचे समर्थन

नुपूर शर्मा यांनी जे धर्मग्रंथांमध्ये लिहिले आहे, तेच मांडले. मात्र, त्यांच्याविरोधात आगडोंब उसळला. त्या जे काही बोलल्या ते जर धर्मग्रंथाच्या बाहेरचे नसेल, तर नुपूर शर्मा यांचे समर्थनच करावे लागेल, असे देसाई यांनी सांगितले.

गरजेचे वाटल्यास निवडणुकाही

हिंदूत्वाच्या मतांचे विघटीकरण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. केंद्रात मोदी, शहा आणि राज्यात शिंदे, फडणवीस हेच आम्हाला हवे आहेत. परंतु, स्थानिक पातळीवर एखादा उमेदवार हिंदूत्वाच्या परिणामांनुसार योग्य नसल्यास अथवा हिंदूत्वासाठी गरजेचे वाटल्यास आम्हीही निवडणुका लढवू, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

सशक्त भारत निर्मितीसाठीच अग्निवीर हवे

17 ते 23 या ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर चौकात गुटखा खाऊन मुलींची छेड काढण्यापेक्षा याच वयात सैन्यात जाऊन मजबूत कठोर शिस्तीचे नागरिक निर्माण होण्यासाठीच अग्निवीर योजना केंद्र सरकारने आणली आहे. अराजकता माजल्यास असे असे तरुण असावेत, असे सांगतानाच देसाई यांनी सशक्त भारत निर्मितीसाठी अग्निवीर हवेच आहेत, असे या योजनेचे समर्थन केले.

Back to top button