अकोले : मृत महिलेवर उपचारप्रकरणी आरोग्याधिकारी सेवामुक्त | पुढारी

अकोले : मृत महिलेवर उपचारप्रकरणी आरोग्याधिकारी सेवामुक्त

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अतिदुर्गम साम्रद आरोग्य उपकेंद्रात वर्षापूर्वी मृत पावलेल्या भीमाबाई भिका रंगडे या महिलेवर समुदाय आरोग्य अधिकाऱी अविनाश पवार यांनी कागदोपत्रीच उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत दैनिक पुढारीत वृत्त प्रसिद्ध करीत पाठपुरावा केल्याने कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांना सेवामुक्त केल्याचा आदेश जि. प. चे कार्यकारी मुख्यधिकारी अशिष येरेकर यांनी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अकोले तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेल्या सांदण व्हॅली या पर्यटन स्थळी साम्रद आरोग्य उपकेंद्र आहे, परंतु शासनाच्या परिपत्रकात समुदाय आरोग्य अधिकारी यांनी दररोज दुपारच्या सत्रात दुपारी 1.30 ते सायं. 5 वाजेदरम्यान दुर्गम आदिवासी भागात 10 घरांना व इतर भागामध्ये 20 घरांना भेटी द्याव्यात.

भेटीदरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी यांनी 30 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करावी, तसेच पाठपुरावा सेवा द्याव्यात, योग्य उपचार करावे व आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी समुपदेशन करावे, तसेच वैद्यकीय सेवा पुरविणे, आजारांचे लवकर निदान, तपासणी व प्राथमिक उपचार करणे, रुग्णांच्या आजाराचा इतिहास घेणे, तपासणी करून योग्य निदान व उपचार करणे, जनतेला 13 प्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या उपकेंद्रामध्ये बाह्य रुग्ण तपासणी मोठ्या प्रमाणावर दाखविण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांनी साम्रद गावातील भीमाबाई भिका रगडे या (दि.18 ऑगस्ट 2021) रोजी या मृत पावलेल्या महिलेची नोंद या उपकेंद्रातील नोंद रजिस्टरला केली. मृत्यू झाला असताना मृत्यू पावलेल्या महिलेवर देखील कागदोपत्री (दि.5) एप्रिल 2022 रोजी बाह्य रुग्ण तपासणी मध्ये सर्दी व डोकेदुखीवर उपचार करण्यात आल्याची नोंद रजिस्ट्ररला करण्यात आली होती, परंतु ज्यावेळी आरोग्य विभागाच्या तपासणीत मृत महिलेवर उपचार केल्याचे लक्षात आल्यावर रुग्ण तपासणी रजिस्टरवर खाडाखोड करण्याचे कामही संबंधिताने केल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. चोळके यांनी साम्रद आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांना मृतावर उपचार केल्याचे कागदोपत्री प्रकरणाबाबत नोटीस देण्यात येऊन सूचना केल्या होत्या. मृत व्यक्तीवर कागदोपत्री उपचार केल्याच्या घटनेने आदिवासी दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये रुग्ण सेवेचा कारभार दैनिक पुढारीने चव्हाट्यावर आणल्याची दखल घेत जि. परिषदेच्या चौकशी समितीने साम्रद उपकेंद्रात घडलेला गंभीर प्रकाराची सविस्तर चौकशी करून, अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला होता.

समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांनीही आपल्या खुलासा वरिष्ठांकडे सादर केल्यानंतर अवलोकन केल्यावर खुलाशामध्ये अतिशय त्रोटक व विसंगत असल्याने सदरचा खुलासा अमान्य करण्यात आला. (दि. 26 ऑगस्ट 2022) पासून समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांना सेवामुक्त करण्यात येत आहे, असा लेखी आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी आशिष येरेकर यांनी दिला आहे.

Back to top button