लोणी : सोयाबीनवर मोझाईक विषाणूचा प्रादुर्भाव | पुढारी

लोणी : सोयाबीनवर मोझाईक विषाणूचा प्रादुर्भाव

लोणी : पुढारी वृत्तसेवा : सोयाबीन पिकांवर सध्या ‘मोझाईक’ या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर यांच्या माध्यमातून केंद्राचे पीक संरक्षण विषय विशेषज्ञ भरत दवंगे, कृषी विद्या विषय विशेषज्ञ शैलेश देशमुख आणि मृद शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे यांनी राहाता परिसरातील लोणी, हसनापूर, हणुमंतगाव, दुर्गापूर या गावांमधील सोयाबीन प्लॉटला प्रत्यक्ष भेटी देवून शेतकर्‍यांशी संवाद साधला असता सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आढळून आले आहे. राहाता तालुक्यातील हसनापूर या ठिकाणी सोयाबीन उत्पादकांची बैठक यावेळी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीदरम्यान सोयाबीन पिकावरील या विषाणूजन्य रोगाविषयी माहिती देताना भरत दवंगे यांनी सांगितले की, या रोगाचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बियाणे आणि रस शोषणार्‍या किडींच्या माध्यमातून होतो. प्रामुख्याने मावा आणि पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडींमार्फत या विषाणूजन्य रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. ज्यावेळी सोयाबीनला फुले आणि शेंगा येण्यास सुरुवात होते. त्यावेळी या रोगाचा प्रसार जास्त वेगाने होतो.

या रोगामुळे सुरुवातीला पिकाच्या पानांवर पिवळसर नक्षीदार ठिपके दिसू लागतात. रोगट झाडाच्या पानांचा काही भाग हिरवा, तर काही भाग पिवळा दिसून येतो, यालाच ‘मोझॅक’ असे म्हणतात. पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसून येतात आणि शेंड्याकडील पाने पिवळी पडून वाळतात. अशा रोगग्रस्त रोपांना कमी प्रमाणात फुले लागतात. त्याचप्रमाणे शेंगामध्ये दाणे भरत नाही, परिणामी उत्पादनात घट येते.
मावा आणि पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडींवर प्रतिबंध ठेवण्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

पेरणीपासूनच अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
सोयाबीनमध्ये या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पेरणीपासूनच अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सुरुवातीलाच पेरणीच्या वेळी मुख्य अन्नद्रव्यांबरोबर सल्फर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्यांचाही वापर करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सुध्दा सेंद्रिय खतात मिसळून करणे आवश्यक आहे.

Back to top button