राहुरी : त्रेचाळीस गावांचा पाणीप्रश्न मिटला ! : आ. तनपुरे | पुढारी

राहुरी : त्रेचाळीस गावांचा पाणीप्रश्न मिटला ! : आ. तनपुरे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : बुर्‍हाणनगर व इतर 42 गावांच्या पाणी योजनेसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 195 कोटी 74 लक्ष 97 हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. मुळा धरणातून संबंधित 43 गावांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होण्याचा मार्ग सुकर होणार होणार असल्याची माहिती राज्याचे माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. आ. तनपुरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून बुर्‍हाणनगर व इतर 42 गावांचा पाणी प्रश्न बिकट बनला होता. जुन्या पाणी योजनेतील अडचणी व गावांना मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून तातडीने या प्रश्नाची दखल घेत महाविकास आघाडी शासनाच्या कालखंडात वेळोवेळी केलेला पाठपुरावा लाभदायी ठरला आहे. महाराष्ट्र शासनाकडून 26 जुलै 2022 रोजी तांत्रिक मान्यता मिळालेली होती. संबंधित पाणी योजना मंजुरीसाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांसह 30 जुलै 2021 ते 18 जून 2022 पर्यंत तब्बल 10 बैठका घेतल्यानंतर योजनेबाबत येणार्‍या अडीअडचणींबाबत मार्ग काढण्यात आले. तांत्रिक बाबी लक्षात घेता योजना सुरळीत चालण्यासाठी योग्य असा आराखडा मांडण्यात आला.

महाविकास आघाडी शासनातील पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बनसोडे यांसह मंत्रालयातही वेळोवेळी बैठका घेतल्यानंतर योजनेला तांत्रिक मंजुरी मिळविण्यात यश आले होते. या योजनेमध्ये राहुरी मतदार संघातील बहिरवाडी, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपूर, मांजरसुंबा, ससेवाडी या गावांचा नव्याने समावेश केला. योजनेअंतर्गत मांजरसुबा, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, जेऊर, इमामपूर, शेंडी, पोखर्डी, धनगरवाडी, ससेवाडी, बहिरवाडी, पिंपळगाव उज्जैनी, आढाववाडी, वडगाव गुप्ता या गावांकरिता स्वतंत्र फीडर तयार करण्यात आलेले आहे.

स्वतंत्र फीडरमुळे मोठ्या गावांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्यास मोलाची मदत होणार आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून या 43 गावातील पाणी समस्या कायमची संपूष्टात यावी, अशी मागणी होती. ग्रामस्थांची पाण्याबाबत होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी अखेर पाणी योजना मंजूर झालेली आहे. सर्वच गावांना मुबलक व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. आ. तनपुरे यांनी सांगितले की, राहुरी मतदारसंघातील अनेक गावांमध्ये मुळा धरणाचे पाणी पोहोच होण्यासाठी पाणी अनेक पाणी योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. ‘माझे मतदारसंघ हेच माझे कुटुंब’ ही भूमिका पूर्वीपासूनच जोपासली आहे.

पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण भटकंती थांबणार आहे. राहुरी मतदारसंघामध्ये अनेक वर्षांपासून रस्ते, वीज व पाणीप्रश्न प्रलंबित होते. त्यानुसार रस्ते, वीजप्रश्न सोडवित असताना पाण्याचा प्रश्नही मार्गी लागत असल्याचे समाधान आहे. आमदारकी पणाला लावत विकास कामांना पाठबळ देण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहे. प्रत्येक गावामध्ये निधीचे वाटप केलेले आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले. दरम्यान, नगर व पाथर्डीसह राहुरी तालुक्यामध्ये पाणी योजनांच्या माध्यमातून मुळा धरणाचे पाणी पोहोच होत आहे. तिन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांकडून आ. तनपुरे यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर व इतर 42 गावांचा पाणीप्रश्न हा जिल्ह्यात चर्चेचा ठरत होता. विधानसभेवेळी पाण्यावरून आरोप- प्रत्यारोप झाले होते. दरम्यान, बुर्‍हाणनगर व इतर 42 गावांच्या प्रादेशिक पाणी योजनेला 195 कोटी 74 लक्ष 97 हजार रुपये इतका भरीव निधी मिळाल्याने 43 गावांचा पाणीप्रश्न कायमचा संपुष्टात येणार असल्याचे समाधान ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे.

Back to top button