नगरमध्ये दहिहंडीचा थरार..!

 नगर : पुढारी वृत्तसेवा :  कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी नगर शहरात दहिहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. गोविंदांच्या थरारांनी नगरकराच्या डोळ्याचे पारणे फेडले. या उत्सवास सिनेअभिनेत्री चित्रांगदा सिंग, प्राची देसाई, धनश्री काडगावकर यांनी हजेरी लावली. तर, छत्रपती शिवाजी महाराज की जय…गोविंदा… गोविंदा अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. दोन वर्ष कोरोनामुळे दहिहंडी उत्सव साजरा करता आला नाही.

यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्याने दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी गोविंदांमध्ये उत्सव होता. दहिहंडी उत्सावात लाखोंच्या बक्षिसांची उधळण करण्यात आली होती. पोलिस प्रशासन व महापालिकेने सुमारे 15 सार्वजनिक मंडळांना दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिली होती. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सिने अभिनेत्री चित्रागंदा सिंग हिने हजेरी लावली.

नेप्ती नाका नालेगाव, दिल्लीगेट, कोंड्या मामा चौक, जय आनंद महावीर आडतेबाजार डाळमंडई, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्यावतीने गंगा उद्यान चौक मिस्किन मळा रोड, मनपाचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे संघर्ष चौक नगर-मनमाड येथे दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. अजिंक्य कोतकर यांच्यावतीने केडगाव येथे दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. संघर्ष प्रतिष्ठानच्या दहिहंडीसाठी अभिनेत्री प्राची देसाई यांनी हजेरी लावली.

Exit mobile version