नगर : बोटा गावात चोरांचा डाळिंब बागेवर डल्ला | पुढारी

नगर : बोटा गावात चोरांचा डाळिंब बागेवर डल्ला

बोटा, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावात मंगळवारी (दि. 16) मध्यरात्री बोटा ते बेलापूर रोडच्या कडेला असलेल्या डाळिंब क्षेत्रातील साधारण शंभर कॅरेट डाळिंब तोडून बाजारभावाप्रमाणे दोन लाख रुपयांच्या मुद्देमालावर सराईत चोरांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

बुधवारी सकाळी यशवंत कारभारी शेळके हे त्यांचे गट नंबर 151 क्षेत्रातील डाळिंब बागेत फेरफटका मारण्यासाठी गेले असता डाळिंब बागेतील झाडावरील मोठ-मोठे डाळिंब चोरी गेल्याचे लक्षात आले. या बागेसाठी केलेले कष्ट, औषधे, फवारणी, मजुरी यासाठी झालेला खर्च आठवून झालेल्या दुःखाने हतबल होत धायमोकलून रडू कोसळले. नंतर त्यांनी सदर घटनेची माहिती त्यांनी गावचे पोलिस पाटील शिवाजी शेळके, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, उपसरपंच पांडुरंग शेळके, तलाठी रवींद्र हिवरे यांना दिली, तसेच दूरध्वनीद्वारे घारगाव पोलिसांना खबर देत प्रत्यक्ष घारगाव पोलिस स्टेशनला जात आपली तक्रार नोंदविली आहे.

मोटारी, केबल आणि मोटार सयकलचीही चोरी

यशवंत कारभारी शेळके हे मंगळवारी श्रीगोंदा येथे लग्नासाठी गेले असता घरी कोणी नाही याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली.
पठार भागातील शेतकर्‍यांच्या मोटारी, केबली, मोटारसायकली, कांदे आणि डाळिंब अशा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये वाढ होत आहे. शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करीत आपले पीक उभे करण्यासाठी काबाडकष्ट करतो आणि चोर ‘आयत्या बीळावर नागोबा’ जसा बसतो, त्याप्रकारे राजरोसपणे चोर्‍या करीत आहे. अशा हाती आलेला शेतमालाच्या चोर्‍या होऊ लागल्या, तर शेतकर्‍यांनी जगायचे कसे? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.

चोरीच्या घटनांचा आलेख वाढता आहे. परंतु घारगाव पोलिस प्रशासनाला या चोरांचा तपास करण्यात अपयश आले आहे. एकही चोर पकडल्याचे माझे निदर्शनास आले नाही. या चोरांना कुणाचाही धाक राहिलेला नाही. चोर राजरोसपणे चोर्‍या करीत आहे. असे होत राहिले, तर शेतकर्‍यांना जगणे कठीण होऊन जाईल. अशा मोकाट चोरांचा जर येत्या पंधरा दिवसांत तपास लागला नाही, तर पठार भागातील शेतकर्‍यांच्या मुलींना एकत्र घेऊन घारगाव पोलिस स्टेशन समोर आंदोलनाचा करण्याचा इशारा आंबी दुमाला गावच्या माजी सरपंच भाग्यश्री नरवडे यांनी दिला आहे.

दरम्यान, पठार भागात अनेक छोट्या, मोठ्या चोर्‍या झालेल्या आहेत. यात चोरांची मोठी टोळी सक्रिय असल्याचे निदर्शनास येत आहे. या चोरांचा सुळसुळाट पठार भागात वाढला आहे. आता तर शेतकर्‍यांच्या उभ्या पिकावर डल्ला मारण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे पठार भागातील शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे या चोर्‍यांचा शोध लागणे गरजेचे आहे.

शेतकरी मोठ्या कष्टाने मोठा खर्च करीत पीक उभे करतो. काबाडकष्ट करून हाती आलेले पीक अशा पद्धतीने चोरी जात असेल, तर शेतकर्‍याला कोणी वाली आहे की नाही. शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, तरी पोलिस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की, त्यांनी या सराईत चोरांचा लवकरात तपास करून या चोरांचा बंदोबस्त करावा, असे माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके यांनी सांगितले.

Back to top button