गव्हाणवाडी-आळेफाटा रस्त्याचे 16 कोटी पाण्यात ! महामार्गाचे निकृष्ट काम | पुढारी

गव्हाणवाडी-आळेफाटा रस्त्याचे 16 कोटी पाण्यात ! महामार्गाचे निकृष्ट काम

जवळे : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील 30 ते 40 गावांच्या दळण वळणाची मुख्य धमनी  समजल्या जाणार्‍या शिरूर-गव्हाणवाडी- राळेगण थेरपाळ ते आळेफाटा या महामार्गाची गेल्या महिन्यापासून पावसाने पुरती ‘वाट’ लावली आहे अनेक ठिकाणी मोठं-मोठे खड्डे पडुन रस्ता उखडला आहे. त्यामुळे ठेकेदाराने केलेल्या निकृष्ठ कामाचे पितळ उघडे पडले आहे.
राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे नऊ ते दहा किमी प्रवास करताना प्रत्यक्ष वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या रस्त्याच्या कामाला गेल्या वर्षीच मंजुरी मिळाली होती. सुमारे 16 कोटींचा निधीही या रस्ता कामासाठी उपलब्ध झाला आहे. दीड महिन्यापूर्वी एका लोकप्रतिनिधीच्या हस्ते सदर कामाचे भूमिपूजनही झाले होते. त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना आता आपला प्रवास सुखकर होणार याचे समाधान वाटू लागले. परंतु ते उद्घाटन झाल्यानंतर ना ठेकेदार आला, ना रास्ता काम सुरू झाले, नागरिक मात्र वाटच पाहत राहिले. शेवटी नागरिकांनी रास्ता रोको करत आंदोलन केले. त्यांनतरच ठेकेदाराने अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याचे काम चालू केले. पावसाळ्याच्या तोंडावर काम घाई घाई ने उरकले. पण पहिल्याच पावसात रस्ता उखडला व खड्डे पडल्याने ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा दर्जा चव्हाट्यावर आला. यात बांधकाम विभाग कानाडोळा करत असून ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

अनेक वर्षांपासून या रस्त्याची दैना आता हटेल, असे वाटत असताना नागरिकांचा मात्र भ्रमनिरास झाला. या रस्त्यावरची खड्ड्याची मालिका मात्र सुरूच राहिली ती अजून तशीच आहे. दरम्यान, प्रथमतः सदर रस्त्याची गुणवत्ता चांगली असल्याचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात होते, परंतु रस्त्याची दुसरी बाजू निकृष्ट दर्जाची असल्याचे पुढे आले.
वाहनांनी वेग धरल्यास अचानक येणार्‍या खड्ड्यामुळे व खालून निघणार्‍या मुरूम मिश्रीत खडीमुळे अपघातास निमंत्रण मिळून मोठे अपघात होऊ शकतात. या अपघातास नेमके जबाबदार कोण, असा सवाल करत संंंबंधित ठेकेदाराची बिले अदा न करण्याची मागणी नागरिक करत आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा तंटा मुक्ती अध्यक्ष पांडुरंग कारखीले किरण कारखीले, संजय कारखीले, आदींनी केली आहे.

नवीनच काम झालेल्या संबंधित रस्त्यावर लगेचच खड्डे कसे पडले, याची चौकशी होणे गरजेचे अहे. भविष्यात या मार्गावर अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण ? एखादा जीव गेल्यानंतर ठेकेदाराला जाग येईल का?.
                            -पांडुरंग कारखिले, तंटामुक्ती अध्यक्ष, राळेगण थेरपाळ

Back to top button