नगर : चार दिवसांत 600 मिमी पाऊस | पुढारी

नगर : चार दिवसांत 600 मिमी पाऊस

नगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या 4 दिवसांपासून नगर शहर आणि परिसरात चांगला पाऊस सुरू आहे. बुधवार व गुरुवारी झालेल्या पावसाने नगरमधील ओढे, नाले वाहू लागले. शहर जलमय झाले आहे. शहरातील गल्लीबोळांत, रस्त्यांवरील सखल भागात पाणी तुंबले आहे. आगामी चार दिवस पावसाचे आहेत. नगर आणखी तुंबण्याची भीती आहे.

दहा दिवसांपूर्वी श्रावण सुरू झाला. यंदा अश्लेषा नक्षत्राने पहिल्याच दिवशी जोरदार आगमन केले. सलग दोन दिवस धुवाँधार पावसाने शहर व परिसरात पाणी साचले. सावेडी, नालेगाव या मंडलांत ढगफुटी झाली. तीन दिवसांपासून पाऊस सुरुच आहे. ओढे, नाले वाहू लागले आहेत. काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले. त्यामुळे सखल भाग पाण्याखली गेला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत.

रविवारी सकाळपासून आभाळ भरून आले. दुपारी पाऊस झाला. सुटीच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारनंतर आभाळ भरुन आले होते. सायंकाळी सहा सातच्या दरम्यान हलक्या वार्‍यासह श्रावण सरी कोसळल्या. त्यामुळे नगर शहरातील सखल पाणी वाहून जाण्यास आणखी अडचण निर्माण झाली. भारतीय हवामान खात्याने आगामी चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊन साथरोग डोके वर काढणार आहे.

सचित्र पाऊस

रविवारी दिवसभर पावसाने मुक्काम ठोकल्याने शहरात दिवसभर रिपरिप होती. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, यामुळे अनेकांचे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. शहरातील आशा चित्रपटगृह, सबजेल रस्ता, नगर-औरंगाबाद रस्ता, कोठला परिसरा आणि चितळे रस्त्यावर पाणी वाहत होते..! (सर्व छायाचित्र : समीर मणियार)

Back to top button