नगर : ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात युवकाचा मृत्यू | पुढारी

नगर : ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगात जाणार्‍या ट्रॅक्टरची मोटारसायकलला समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील 25 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 1) रात्री आठच्या सुमारास टाकळी काझी ते बीड रस्त्यावर घडली.

या अपघातात राजू किसन शिंदे (वय 25, रा. सालेवडगाव, ता. आष्टी, जि. बीड) याचा मृत्यू झाला आहे. राजू शिंदे व त्याचा एक मित्र, असे दोघे जण मोटारसायकलवर टाकळी काझीकडून बीडच्या दिशेने जात असताना रात्री आठच्या सुमारास भातोडी शिवारातील तांबोडी दूध डेअरी फार्मजवळ बीडकडून टाकळी काझीकडे येत असलेल्या ट्रॅक्टरची व मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली.

या अपघातात राजू शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला त्याचा मित्र राहुल दारकुंडे (रा.घोडेगाव, ता. नेवासा) याने खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Back to top button