नगर : चित्तथरारक कुस्त्यांनी रथयात्रेची सांगता | पुढारी

नगर : चित्तथरारक कुस्त्यांनी रथयात्रेची सांगता

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या दोन दिवसीय रथयात्रेची सांगता प्रेक्षणीय कुस्त्यांनी झाली. कर्जत तालुक्यातील सर्वच पैलवानांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत, विरोधी पहिलवानांना आस्मान दाखवित उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांचे वाहवा मिळवली. यावेळी 300 पेक्षा जास्त कुस्त्या झाल्या.

अंतिम कुस्ती कर्जत येथील नामांकित पैलवान शुभम शिवाजी धांडे व इंदापूर येथे नाथा मारकड आणि तालुक्यातील दुसरा नामांकित पहिलवान ऋषिकेश धांडे व करमाळा येथील अनिल जाधव यांच्यात झाली. रोख 51 हजार किताब असलेल्या या दोन्ही कुस्त्या अतिशय चुरशीच्या झाल्या. सर्वच पैलवान अतिशय ताकदवान होते. सुरुवातीला खडाखडी, यानंतर एकमेकाचा अंदाज आल्यावर डाव-प्रतिडाव टाकण्यात आले. परंतु, पंचांनी या दोन्ही कुस्त्या बरोबरीत सोडविल्या.

या कुस्ती आखाड्यात उद्योजक रणजित नलवडे यांनी कर्जत तालुक्यातील विजयी पहिलवानांचा सत्कार केला. पैलवान दिलीप नाना क्रीडा संकुलाच्या मैदानावर या कुस्त्या घेण्यात आल्या. यावेळी राज्यभरातील नामांकित पैलवानांनी हजेरी लावली. यामध्ये गुलाब बर्डे, बाळासाहेब आवारे, आदम शेख यांच्यासह अनेक प्रमुख पैलवान उपस्थित होते. यावेळी यात्रा कमिटीचे प्रमुख मेघनाथ पाटील, प्रदीप पाटील, बाबासाहेब धांडे, अंबादास पिसाळ, आबासाहेब पाटील, काकासाहेब धांडे, दादासाहेब सोनमाळी, सुरेश खिस्ती, काकासाहेब ढेरे अनिल गदादे आदी उपस्थित होते.

कुस्ती आखाड्याची जबाबदारी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले व माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पार पाडली. पंच म्हणून प्रा.शिवाजी धांडे, प्रशांत पाटील, शहाजी नलवडे, तानाजी पाटील, ऋषिकेश धांडे यांनी काम पाहिले.

Back to top button