नगर : घरपट्टी, पाणीपट्टी भरून मिळेना पाणी!; महिला आक्रमक | पुढारी

नगर : घरपट्टी, पाणीपट्टी भरून मिळेना पाणी!; महिला आक्रमक

नगर, पुढारी वृत्तसेवा : साहेब, आम्ही घरपट्टी, पाणीपट्टी भरतो. पण, आम्हाला सुविधा मिळत नाहीत. तक्रार केल्यावर दोन दिवस पाणी मिळते. पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न. वारंवार तक्रार करूनही काही फरक पडत नाही. पाणी नाही, रस्ता नाही साहेब तुम्हीच सांगा तिथं कसं रहायचं, अशा व्यथा प्रभाग 15 मधील महिलांनी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासमोर मांडल्या.

प्रभाग 15 मधील महिला व पुरूषांनी पाणी व रस्त्याच्या प्रश्नी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त जावळे यांना निवेदन देऊन समस्या मांडल्या. यावेळी सभापती कुमार वाकळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विनीत पाउलबुद्धे माजी नगरसेवक विजय गव्हाळे, प्रमोद कुलकर्णी, सागर पंडित, गणेश शेळके, अशोक जाधव, शेषराव आमटे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

निवेदात म्हटले, प्रभाग 15 मधील सुखकर्ता कॉलनी, प्रियंका कॉलनी, लक्ष्मी कॉलनी या भागात पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भागात वेळेवर पाणी मिळत नाही. नगरसेवकांकडे तक्रार केल्यानंतर एक दिवस पाणी मिळते. मात्र, पुन्हा तिच परिस्थिती होते. तक्रार केल्यानंतर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोणीही लक्ष देत नाही. एखादी पाईपलाईन खोदल्यानंतर त्यात दगड, प्लॅस्टिक पिशव्या निघतात. त्यामुळे याभागात फेज टूची लाईन टाकून द्यावी. तसेच, याभागात वीस वर्षांपूर्वी रस्ते करण्यात आले होते. त्यानंतर एकदाही रस्ते करण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावेत.

व्हॉल्व्ह नेमकं कोण सोडतो?

टाक्यात पाणी असूनही आम्हाला पाणी मिळत नाही. याचा शोध घेतला असता सक्कर चौक, यश पॅलेश चौकातील मुख्य वाहिनीचे व्हॉल्व्ह कर्मचार्‍याऐवजी दुसरेच कोणीतरी सोडते हे लक्षात आले. त्याचा मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांनी शोध घ्यावा, असे आवाहन एका तरुणाने केले.

Back to top button