श्रीगोंद्यातील कामांसाठी पाच कोटींचा निधी : आमदार बबनराव पाचपुते | पुढारी

श्रीगोंद्यातील कामांसाठी पाच कोटींचा निधी : आमदार बबनराव पाचपुते

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा शहरातील विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण या निधीची मागणी केली होती. त्यांच्या आदेशाने हा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. आमदार पाचपुते म्हणाले, शहर विकासाचे नियोजन आपण केले होते. 2019च्या नगरपालिका निवडणुकीनंतर या विकास कामांच्या नियोजनाला काही प्रमाणात खीळ बसली.

नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरवासीयांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. ही जबाबदारी लक्षात घेत; आपण मागील तीन वर्षांचा विकास कामांचा अनुशेष आता भरून काढणार आहे.

गटनेत्या छाया गोरे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके व अन्य नगरसेवकांची या बाबत बैठक घेऊन, शहरातील प्रश्न व अडचणी समजून घेतल्या. सविस्तर कामांची यादी मुख्यमंत्र्यांना देऊन पाच कोटी रुपयांची मागणी केली. त्यामध्ये शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटकरण व पेव्हर ब्लॉक बसणे आदी कामे आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने आदेश देत नगरविकास विभागाने हा निधी मंजूर केला. ही कामे तातडीने सुरू करण्यात येणार आहे. आणखी निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जिल्हा नियोजन समितीकडे मागे शहराच्या निधीसाठी मागणी केली होती. त्यावर निर्णय घेत एक कोटी 16 लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. तेही काम लवकर सुरू करण्यात येत असल्याचे पाचपुते यांनी म्हटले.

Back to top button