नगर : पावसाने मुळा परिसर हिरवाईने नटला! | पुढारी

नगर : पावसाने मुळा परिसर हिरवाईने नटला!

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर आषाढी सरींची कृपा झाली आहे. राहुरी परिसरात कोठेही अतिवृष्टी नसल्याचा सर्वस्वी लाभ शेतकर्‍यांना झाला आहे. कधी ऊन तर कधी पाऊस अशा परिस्थितीने खरीप पिकांना टॉनिक लाभल्याचे मत कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. कधी रिमझिम सरी तर कधी ऊन -प्रकाशाने खरीप पिकांची माव्यापासूनमुक्ती झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.

पावसाने केलेली कृपा पाहता मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुळा पाणलोट क्षेत्रात आषाढची संततधार सुरूच आहे. धरण साठ्यात कमालीची वाढ होत असल्याने सलग चौथ्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा उंचावली आहे. दुसरीकडे राहुरी परिसरामध्ये शेतकर्‍यांना आषाढी सरींचा वर्षाव खरीप पेरण्यांसाठी टॉनिक ठरल्याचे चित्र आहे.

सरासरी 24 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना शेतकर्‍यांनी सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण केल्या आहेत. 105 टक्के पेरणी पूर्ण झाली. राहुरीत सरासरी 106.1 मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 135.8 मिमी पावसाची नोंद कृषी विभागाकडे झाली. सात्रळ व ताहाराबाद महसूल मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे तर सर्वाधिक वांबोरी मंडळात पाऊस पडल्याची नोंद आहे.

राहुरी मंडळामध्ये 183.6 मिमी (113.3 टक्के), सात्रळ 132.2मिमी (81.6 टक्के), ताहाराबाद 124.7 मिमी (77 टक्के), देवळाली प्रवरा 177.8 मिमी (109.8 टक्के) अशी आहे.

पाऊस काही काळ थांबण्याची गरज : ठोकळे

राहुरी परिसरात कधी ऊन तर कधी पाऊस असल्याचा लाभ खरीप पिकांना झाला आहे, परंतु पाऊस सलग पडत राहिल्यास खरीप पिकांना बुरशीजन्य रोग, झाडांची वाढ खुंटणे, रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यास किड लागणे, मुळ्या खराब होणे या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यास त्याचा सर्वस्वी लाभ खरीप पिकांना शेतकर्‍यांचे पीक उत्पादनात मोठी वाढ होईल, असे मत राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी व्यक्त केले.

Back to top button