नगर : झेडपीच्या 372 कामांचा पुन्हा ‘ड्रॉ’! | पुढारी

नगर : झेडपीच्या 372 कामांचा पुन्हा ‘ड्रॉ’!

नगर, पुढारी वृत्तसेवा : ‘बी वन’चा सावळा गोंधळ रोखतानाच सुशिक्षीत बेरोजगार, मजूर संस्था आणि खुल्या वर्गाला समप्रमाणात कामे मिळाली पाहिजेत, या हेतूने जिल्हा परिषदेने काम वाटपासाठी लकी ड्रॉ सुरू केलेला आहे. गेल्या आठवड्यातच अशापद्धतीने 372 कामांचे वाटप केले जाणार होते. मात्र, या कामांसाठी केवळ 4600 अर्ज प्राप्त असल्याने काम वाटपात असमानता येऊ नये, यासाठी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी ही सोडतच स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काल सोमवारपासून ग्रामपंचायतींसह सर्व 372 कामांसाठी पुन्हा अर्ज मागाविण्यात आल्याचे समजते.

जिल्हा परिषदेअंतर्गत वाटप केल्या जाणार्‍या छोट्या-मोठ्या कामांमधून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. नगर झेडपीतूनही अशा 372 कामांसाठी सुशिक्षीत बेरोजगार अभियंता, मजूर संस्था आणि खुल्या गटातील अभियंता यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. सीईओ आशिष येरेकर व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात यातील काही कामे ग्रामपंचायतीला देण्यात येणार होती. उवर्रीत कामांच्या 33-33-33 टक्के प्रमाणे तीनही विभागात समान वाटप केले जाणार होते. हे वाटप करताना संगणकीय लकी ड्रॉ पद्धतीचा वापर केला जाणार होता.

दरम्यान, गेल्या सोडतीला साधारणतः 300 कामांसाठी 8 हजारापेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यामधून सोडतीव्दारे पारदर्शीपणे काम वाटप झाले. यावेळी मात्र 365 कामांसाठी 4600 अर्ज आल्याचे सांगितले गेले. त्यात, सुशिक्षीत बेरोजगारांचे अर्ज पुरेसे असले, तरी मजूर संस्थांचे अर्ज कमी होते. त्यामुळे काम वाटपात असमानता येऊन एकाच ठेकेदाराला जास्त कामे जाण्याचीही शक्यता होती. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी12 जुलैरोजी होणारी सोडतच रद्द केली. आता सोमवारपासून पुन्हा अर्ज करावे लागणार आहेत. सात दिवसांची त्यासाठी मुदत आहे. त्यामधून पुढच्या आठवड्यात ती सोडत काढून त्याव्दारे काम केली जाणार आहे. मात्र, 12 जुलैला रद्द केलेल्या 372 कामांपैकी काही कामे ‘ग्रामपंचायती’च्या नावाखाली ठेकेदारांच्या घशात घातले जाणार, आणि उवर्रीत कामांसाठी लॉटरी काढणार की, सर्वच्या सर्व कामांसाठी पुन्हा प्रक्रिया राबविली जाणार, याकडे लक्ष असणार आहे.

‘उत्तरे’ला प्रशासनाचे अभय का?

बांधकाम उत्तर विभागाच्या अनेक तक्रारी प्रशासनाच्या कानावर आहेत. दक्षिणेत काम वाटपाचे जे काम वरिष्ठ सहायक करतात, ते उत्तरेत ‘कनिष्ठ’कडे दिल्याने गौडबंगाल वाढले आहे. काही पदांवर दिलेला पदभार हा देखील चर्चेचा विषय आहे. शिवाय मंत्रालयातून झालेल्या बदल्या, त्यानंतर तातडीची स्थगिती हा विषय तर विधानसभेतही गाजणार असल्याची चर्चा आहे. असे असतानाही प्रशासन ‘उत्तरे’ला अभय का देते, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोणकोणत्या कामांचे होणारे वाटप!

झेडपी काम वाटप समितीच्या माध्यमातून अंगणवाडी दुरुस्ती करणे, रस्ता मजबूतीकरण करणे, शाळा खोली दुरुस्ती करणे, शाळा भिंतीची दुरुस्ती करणे, शाळा स्लॅब दुरुस्ती करणे, शाळेच्या संरक्षक भिंती दुरुस्ती करणे, नवीन बांधकाम करणे, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती करणे, सभामंडप शेड बांधकाम करणे, परिसर सुशोभिकरण करणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सार्वजनिक दिवाबत्ती सोय करणे, जेनेरीक मेडीकल दुरुस्ती करणे, साठा बंधारा दुरुस्ती करणे, इत्यादी प्रकारची 372 कामे घेण्यात आली आहेत.

कामांसाठी अपेक्षित अर्ज न आल्याने तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे काम वाटपात असमानता येऊ नये, यासाठी 12 जुलैरोजी होणारी सोडत रद्द करण्यात आली आहे. सोमवारपासून नव्याने प्रक्रिया राबवून काम वाटपाची सोडत केली जाईल.

                                        – संभाजीराव लांगोरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

Back to top button