चोरीतील मुद्देमाल फिर्यादीकडे सुपूर्द | पुढारी

चोरीतील मुद्देमाल फिर्यादीकडे सुपूर्द

शेवगाव शहर/तालुका : पुढारी वृत्तसेवा  : तालुक्यातील आखेगाव येथील चोरीतील मुद्देमाल हस्तगत करून, पोलिसांनी तो फिर्यादीला सुपूर्द केला आहे. सात महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करण्यास व त्यांच्याकडून सदर मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले होते. उत्तम विठोबा काटे यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून दि 25 जानेवारी 2022 रोजी चोरी करण्यात आली होती.

त्यावेळी काटे यांच्या घरातून साधारणपणे 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच काही रोख रक्कम चोरी गेले होते. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. पोलिस अधिकार्‍यांना अधिक तपासामध्ये सराईत गुन्हेगारांची खबर मिळाली. त्यामध्ये श्याम चव्हाण, तुषार भोसले, प्रवीण भोसले, विनोद भोसले (रा.आष्टी, जि. बीड) या सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर तपासी अधिकारी बी. व्ही. राठोड यांनी गुन्हेगारांना जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल ज्यामध्ये सात ग्रॅम सोन्याचा सर, आठ ग्रॅमची सोन्याची पोत हस्तगत केली. 14 जुलै 22 रोजी हा मुद्देमाल पुन्हा फिर्यादीला देण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बी. व्ही. राठोड यांनी पूर्ण केला.

Back to top button