नगर : शिष्यवृत्ती परीक्षा तिसर्‍यांदा ढकलली पुढे! | पुढारी

नगर : शिष्यवृत्ती परीक्षा तिसर्‍यांदा ढकलली पुढे!

नगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून वेध लागलेली शिष्यवृती परीक्षा बुधवार दि. 20 जुलै रोजी पार पडणार होती. मात्र, अतिवृष्टीमुळे उद्धवलेली पूर सदृश्य स्थिती आणि काही ठिकाणी झालेल्या भुस्खलनामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे आता 20 ऐवजी रविवार दि. 30 जुलैरोजी ही परीक्षा घ्यावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे यांनी केल्या आहेत.

कोरोना कालखंडामुळे यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू होती. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी परीक्षेची 20 जुलै ही तारीख अंतिम झाली. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सर्व मुख्याध्यापकांना शिष्यवृत्तीमध्ये नगरचा टक्का वाढविण्यासाठी आवश्यक असलेली तयारी करण्याबाबत सक्त सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष शाळेत मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांनी मुलांकडून चांगली तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांची तब्बल 11 वेळा ऑफ आणि ऑनलाईन सराव परीक्षा घेतलेली आहे.

दरम्यान, पाचवी आणि आठवीच्या परीक्षेसाठी 52 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. 223 केंद्रावर पाचवीचे 32 हजार 238 विद्यार्थी, तर इयत्ता आठवीचे 149 केंद्रावर 20 हजार 24 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सज्ज होते. मात्र, परीक्षा चार दिवसांवर आल्यानंतर पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे. राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता ही परीक्षा 31 जुलैला घ्यावी, असे आयुक्तांनी कळविले आहे.

गुरुजी निवडणुकीत व्यस्त ..!

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा काही दिवसांवर आली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना सराव परीक्षा आणि मार्गदर्शन गरजेचे असताना काही शाळांती ल शिक्षक मात्र बँकेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचे उदासिन चित्र आहे. त्यामुळे पालकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.

पाचवीची परीक्षा सहावीत होणार!

इयत्ता 5 वीच्या वर्गासाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे यावर्षी लांबणीवर पडली. त्यामुळे पाचवीच्या वर्गात परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी आता सहावीत गेल्यानंतर त्यांची परीक्षा पार पडत आहे. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळा सोडून माध्यमिकला प्रवेश घेतला आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या अभ्यासातही खंड पडल्याचे वास्तव आहे.

परीक्षार्थी आणि केंद्र तयारी
  • इयत्ता पाचवी : 32239
  • इयत्ता आठवी : 20024
  • परीक्षा केंद्र : 372
  • केंद्र संचालक : 372
  • पर्यवेक्षक : 2643
  • परिचर : 708
  • उपकेंद्र संचालक : 03
  • एकूण मनुष्यबळ : 3726

Back to top button