नगर : जागेवरून राहुरीत महिलेला जबर मारहाण | पुढारी

नगर : जागेवरून राहुरीत महिलेला जबर मारहाण

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : ‘माझ्या वडिलांनी दिलेल्या एक गुंठा जमिनीमध्ये यायचे नाही,’ असे म्हणत एका 55 वर्षीय महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जयगुन्नीसा बब्बीर शेख (वय 55, रा. सोनार गल्ली, राहुरी) या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जयगुन्नीसा या त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. तेव्हा आरोपी सनी मेहेत्रे तेथे गेला आणि जयगुन्नीसा शेख यांना म्हणाला की, ‘माझे वडील गोरक्षनाथ मेहेत्रे यांनी तुला दिलेल्या एक गुंठा जमिनीमध्ये यायचे नाही. त्या जागेत बांधलेल्या तुझ्या शेळ्या घेऊन जा’. त्यावर जयगुन्नीसा शेख त्याला म्हणाल्या, ‘मी तुझ्या वडील गोरक्षनाथ मेहेत्रे यांना दोन लाख रुपये हातउसने दिले होते. त्या बदल्यात त्यांनी मला ती जमीन दिली आहे. तू माझे दोन लाख रुपये दे, मी ती जमीन मोकळी करून देते’

त्याचा राग आल्याने आरोपी सनी मेहेत्रे याने जयगुन्नीसा शेख यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू जागा मोकळी केली नाहीतर तुझे हातपाय काढून टाकीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी सनी मेहत्रे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button