नगर : कत्तलीस जाणार्‍या 10 जनावरांना जीवदान | पुढारी

नगर : कत्तलीस जाणार्‍या 10 जनावरांना जीवदान

संगमनेर/ श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणार्‍या दोन वाहनांना पकडून, 10 जनावरांना संगमनेर शहर पोलिसांनी जीवदान दिले. ही घटना रविवार (दि.10) आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जोर्वे रोड परिसरात फादरवाडी नजीक घडली. पोलिसांनी या कारवाईत साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, श्रीरामपुरातही आज सोमवारी वार्ड नं. 2 मध्ये छापा टाकून दाटीने आखडून बांधलेल्या दोन गायांसह दोन वासरांची सुटका शहर पोलिसांनी केली. याप्रकरणी रिजवान इस्माईल कुरेशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पो. नि. संजय सानप यांनी सांगितले.

महाराष्ट्रात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र जनावरांची सर्रास कत्तल केली जात आहे. दोन वेगवेगळ्या वाहनातून कत्तलीसाठी जनावरे नेली जात होती. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी शहरालगतच्या जोर्वे रोड परिसरातील फादरवाडीजवळ दोन वाहने अडविले. तपासणी केली असता या वाहनांमध्ये जिवंत जनावरे निर्दयपणे बांधून ठेवलेले पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पिकअप व छोटा हत्तीमध्ये बांधलेल्या 10 जनावरांची मुक्तता केली.

या कारवाईमध्ये 70 हजार रुपये किमतीची 7 जिवंत गोवंश जनावरे, अडीच लाख रुपयांची पिकअप, छोटा हत्तीमध्ये 30 हजार रुपयांचे 3 गोवंश जनावरे, 2 लाख रुपयांचे वाहन असा एकून 5लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत पो. ना. गजानन गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गणेश दगडू कदम (वय 32) रा. करूले, परवेज याकुब कुरेशी, (वय 30) रा. भारत नगर, महंम्मद अलीम कुरेशी, रा. मोगलपुरा, संगमनेर, सलीम ऊर्फ सोनु कुरेशी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, श्रीरामपुरात डिवायएसपी संदीप मिटके व पो. नि. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काँ. नितीन सिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या रूपात अवतरले पांडुरग..!

आषाढी एकादशीच्या दिवशीच कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या दहा जनावरांना पोलिसांच्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याने या जनावरांचे प्राण वाचले. कदाचित पोलिस वेळीच आले नसते तर 10 जनावरांची पवित्र अशा आषाढी एकादशीच्या दिवशीच कत्तल झाली असती. जनावरांचे दैव बलवत्तर म्हणून पोलिसांच्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंग अवतरल्याने या दहा जनावरांची मृत्यूच्या खाईतून सही सलामत सुटका झाल्याचे चर्चा सुरु आहे.

Back to top button