करंजी : आषाढी एकादशीमुळे बकरी ईदला कुर्बानी नाही | पुढारी

करंजी : आषाढी एकादशीमुळे बकरी ईदला कुर्बानी नाही

करंजी : पुढारी वृत्तसेवा : हिंदू बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असणारी आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाची असणारी ईद एकाच दिवशी आल्यामुळे यंदा पशूहत्या न करता बकरी ईद साजरी करण्याची भूमिका मिरी, करंजी व तिसगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतल्याची माहिती जाकीर पटेल, राजू शेख, राजू इनामदार, मुसाभाई शेख, मेहबूब शेख, खलील पटेल, सलीमभाई शेख, जलील शेख, आयुब सय्यद, मुबारक सय्यद यांनी दिली.

रविवारी आषाढी एकादशी आहे. त्याच दिवशी बकरी ईद देखील आहे. बकरी ईदच्या दिवशी पशूची कुर्बानी दिली जाते. परंतु, त्याच दिवशी आषाढी एकादशी येत असून, सर्व हिंदू समाज बांधवांना उपवास असतो. त्यामुळे हिंदू व मुस्लिम समाज बांधवांचे संबंध सलोख्याचे आणि एकोप्याचे राहावेत, म्हणून या दिवशी बकरी ईद निमित्त कोणीही पशूहत्या न करता सामूहिक नमाज पठण करून बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाकीर पटेल, राजू शेख, राजू इमानदार, मुस्साभाई शेख, मेहबूब शेख, खलील पटेल, सलीम शेख, जलील शेख, अय्युब सय्यद, मुबारक सय्यद यांच्यासह मिरी येथील टीपू सुलतान यंग ग्रुप व संपूर्ण मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी असल्याने मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देता केवळ सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.
– राहुल गवळी
पंचायत समिती सदस्य

Back to top button